एपिलेप्सी केअर सेंटर ठरतेय रुग्णांसाठी वरदान
एपिलेप्सी केअर सेंटर ठरतेय रुग्णांसाठी वरदान
‘केईएम’मधील उपचाराने ७५० रुग्णांच्या जीवनमानात बदल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : केईएम रुग्णालयातील समग्र एपिलेप्सी केअर सेंटर आणि आधुनिक शस्त्रक्रियांमुळे एपिलेप्सीच्या रुग्णांचे आयुष्य मोठ्या प्रमाणात बदलत आहे. दैनंदिन जीवनावर अवलंबून असणाऱ्या अनेक रुग्णांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आत्मविश्वास या उपचारांमुळे परत मिळाला आहे.
महापालिकेच्या केईएम रुग्णालयात उपचार घेतलेल्या सुमारे ७५० एपिलेप्सी रुग्णांच्या जीवनात महत्त्वपूर्ण सुधारणा घडवण्यात या केंद्राने लक्षणीय यश मिळवले आहे. ३० वर्षीय महेश जाधव (नाव बदललेले) हे त्यापैकीच एक आहेत. सतत एपिलेप्सीचे झटके येत असल्याने त्यांना कामावर जाणे किंवा घराबाहेर निर्धास्तपणे फिरणे अशक्य झाले होते; मात्र केईएममधील विशेष उपचार आणि शस्त्रक्रियेने त्यांचे झटके जवळपास पूर्ण थांबले असून, आज ते नियमित कामावर जात आहेत आणि सामान्य जीवन जगत आहेत. महेश यांच्यासारखे अनेक रुग्ण या केंद्रामुळे नवजीवन मिळाल्याचे सांगतात. केईएम रुग्णालयात वर्ष २००१ मध्ये ‘समग्र एपिलेप्सी केअर सेंटर’ सुरू करण्यात आले. या केंद्रात न्यूरोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन, रेडिओलॉजिस्ट अशा बहुविद्याशाखीय तज्ज्ञांचे पथक रुग्णांचे सर्वसमावेशक मूल्यांकन करून उपचार योजना ठरवते, औषधांनी पूर्ण परिणाम न मिळणाऱ्या सुमारे २० ते ३० टक्के एपिलेप्सी रुग्णांसाठी शस्त्रक्रिया हा प्रभावी पर्याय ठरतो. रुग्णाचे ‘ईईजी’, ‘एमआरआय’ तसेच इतर चाचण्यांचे बारकाईने विश्लेषण करूनच सर्जरी केली जाते, असे डॉक्टरांनी सांगितले.
सेंटर सुरू झाल्यापासून आतापर्यंत २५० पेक्षा जास्त एपिलेप्सी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. शस्त्रक्रियेनंतर अनेक रुग्णांना झटके थांबण्याबरोबरच शिक्षण, रोजगार आणि सामाजिक आयुष्यातही नवी संधी मिळत असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय एपिलेप्सी दिनानिमित्त १७ नोव्हेंबर रोजी केईएम रुग्णालयाने ही माहिती जाहीर करताना, एपिलेप्सी हा योग्य निदान आणि आधुनिक उपचारांनी मोठ्या प्रमाणावर नियंत्रणात येऊ शकणारा आजार असल्याचे नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

