मूल्याधिष्ठित शिक्षणासाठी प्रयत्नशील राहावे
मूल्याधिष्ठित शिक्षणासाठी प्रयत्नशील राहावे
राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे कुलगुरूंना आवाहन
मुंबई, ता. १७ : ‘महाराष्ट्राच्या शिक्षणव्यवस्थेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी सातत्यपूर्ण आणि संघटित प्रयत्नांची आवश्यकता आहे. केवळ योजना तयार करणे पुरेसे नसून, त्यांची व्यवहार्य अंमलबजावणी सातत्याने झाली पाहिजे. विद्यापीठांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गुणांकन पातळी सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे तसेच प्रत्येक विद्यापीठाशी थेट जोडलेली अशी टास्क फोर्स स्थापन करून ती दर पंधरवड्याला प्रगती अहवाल सादर करेल अशी प्रणाली निर्माण करावी,’ असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी राज्यातील उपस्थितीत विद्यापीठांच्या कुलगुरूंना केले.
राजभवन येथे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० आणि ‘व्हिजन महाराष्ट्र २०४७’ या विषयावर कार्यशाळेचे सोमवारी (ता. १७) आयोजन करण्यात आले होते. या वेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तांत्रिक शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी तसेच राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते. या वेळी राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले, की विद्यापीठांनी रोजगारक्षम अभ्यासक्रम विकसित करावेत, जे थेट उद्योगजगताशी निगडित असतील. शिक्षण हे समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीशी जोडले गेले पाहिजे. नव्या तंत्रज्ञानाशी सुसंगत राहण्यासाठी शिक्षक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण आवश्यक आहे. प्रशिक्षण जितके गुणवत्तापूर्ण तितकी शिक्षणाची गुणवत्ता उंचावेल. आपल्या प्रशिक्षण केंद्रांचा दर्जा अधिक उंचवण्याची आवश्यकता आहे. पुढे ते म्हणाले, की विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, परंपरा आणि नैतिक मूल्ये यांविषयी संवेदनशील केले पाहिजे. विद्यापीठांनी अशा वक्त्यांना आमंत्रित करावे, ज्यांच्या विचारांमधून विद्यार्थ्यांना जीवनमूल्यांची प्रेरणा मिळेल. विद्यार्थ्यांशी संवाद वाढवावा, त्यांच्या समस्या जाणून त्यांना योग्य मार्गदर्शन करावे. आपण ज्या भावनेने काम करू त्याच भावनेने विद्यार्थी देशाच्या प्रगतीस हातभार लावतील. शासन, शिक्षण विभाग आणि विद्यापीठांनी परस्पर सहकार्याने सतत संवाद आणि कृती ठेवली पाहिजे. नियोजन, प्रशिक्षण आणि संस्कार या त्रिसूत्रीवर काम केल्यास महाराष्ट्र निश्चितच देशातील आदर्श शैक्षणिक राज्य बनेल, असा विश्वासही राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केला.
शैक्षणिक धोरणांसंदर्भातील कार्यशाळेचे आयोजन दर तीन महिन्यांनी उच्च तंत्रशिक्षण विभागामार्फत करण्यात येते. यापुढेही आपण अशा कार्यशाळेत ऑनलाइन माध्यमातून सहभागी होऊन मार्गदर्शन करावे, अशी विनंती राज्यपालांना करण्यात आली आहे.
- चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

