११ महिन्याच्या चिमुकल्याला आईकडून पुनर्जीवन!
११ महिन्यांच्या चिमुकल्याला आईकडून पुनर्जीवन!
-दुर्लभ आजारावर मात; यशस्वी यकृत प्रत्यारोपण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : अवघ्या ११ महिन्यांच्या एका बालकाला जन्मल्यापासून दररोज १० ते १२ तास काचेच्या पेटीत ठेवले होते, मात्र एच. एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वी यकृत प्रत्यारोपण केले. या चिमुकल्याला आईने स्वतःच्या यकृताचा एक लहानसा भाग दिला. त्यामुळे मुलाला आईकडून दुसऱ्यांदा नवजीवन दिले.
राजकोट येथील झोरैज शेख हा ११ महिन्यांचा बालक क्रिग्लर-नज्जर सिंड्रोम टाईप-१ या दुर्मिळ आनुवंशिक आजाराने त्रस्त होता. यकृत प्रत्यारोपण करणाऱ्या बालरोग-हेपॅटोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. आरती पावरिया यांनी सांगितले की, हा आजार यकृताला बिलीरुबिन योग्यरीत्या प्रक्रिया करण्यापासून रोखतो. बिलीरुबिनची पातळी वाढल्यास तीव्र पिवळे काविळ होते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूला गंभीर हानी होऊ शकते. सामान्य मुलांमध्ये बिलीरुबिनचे प्रमाण साधारण दोन टक्के असते; तर झोरैजचे हे प्रमाण तब्बल ३६ टक्क्यांपर्यंत पोहोचले होते. परिस्थिती इतकी बिघडली होती की, नवजातांना दिली जाणारी फोटोथेरपी त्याला ११ महिन्यांपर्यंत रोज द्यावी लागत होती. कधी १०-१२ तास, तर अनेक वेळा सलग २४ तासही त्याला काचेच्या पेटीत ठेवावे लागत होते. यामुळे त्याच्या भविष्यास आणि मानसिक विकासास मोठा धोका निर्माण झाला होता.
योग्य वेळी निदान झाल्याने या आजाराचे गांभीर्य ओळखून वैद्यकीय टीमने बालकाला सहा महिन्यांच्या वयापासून सतत निरीक्षणाखाली ठेवले. कुटुंब राजकोटमध्ये असल्याने रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी व्हिडिओ सल्लामसलतींच्या माध्यमातून उपचार सुरू ठेवले. डॉक्टरांच्या मते, अंतर असूनही तंत्रज्ञानाने उपचार प्रक्रिया सुलभ केली.
प्रत्यारोपणासाठी आईच्या यकृताचा अवघा १० ते १५ टक्के भाग घेण्यात आला. बालकाचे शरीर लहान असल्याने इतकाच भाग पुरेसा ठरला. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, बालकाची प्रकृती सुधारली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला आता पुन्हा कधीही फोटोथेरपीची आवश्यकता भासणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

