पालिकेच्या ४२६ घरांसाठी २०३७ जणांनी भरले अर्ज
पालिकेच्या ४२६ घरांसाठी २,०३७ अर्ज
अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगावमध्ये प्रतिसाद; २० नोव्हेंबरला सोडत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई ता. १८ : पालिकेकडून होणाऱ्या ४२६ घरांच्या लॉटरीसाठी १४ नोव्हेंबर या अंतिम मुदतीपर्यंत २,०३७ जणांनी अर्ज भरले आहेत. हे अर्जदार येत्या २० नोव्हेंबरला काढण्यात येणाऱ्या सोडतीसाठी पात्र असणार आहेत. अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी ही घरे असून, अर्जदारांचा मरोळ-अंधेरी, गोरेगाव, कांदिवली येथील घरांसाठी चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
या घरांची किंमत ५९ लाख ते ७८ लाखांपर्यंत आहे. भायखळा येथील कोटींच्या घरांना अल्प प्रतिसाद मिळाला आहे. येत्या २१ नोव्हेंबरला सोडतीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. विकास नियंत्रण नियमावली-२०३४च्या विनियम १५ व ३३ (२०) (ब) अंतर्गत चार हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडावरील प्रकल्प राबवणाऱ्या विकसकांडून पालिकेला प्रीमियमच्या बदल्यात घरे द्यावी लागतात. अशी ८०० घरे पालिकेच्या ताब्यात आली आहेत. त्यातील ४२६ घरांची सोडत काढून विक्री करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला. पालिकेकडून पहिल्यांदाच म्हाडाच्या धर्तीवर २० नोव्हेंबला अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी सोडत काढली जाणार आहे.
१६ ऑक्टोबरपासून घरांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आणि १४ नोव्हेंबरला अंतिम मुदत होती. भांडुप, गोरेगाव, कांजूरमार्ग, भायखळा, जोगेश्वरी, कांदिवली, अंधेरी, दहिसर, गोरेगाव अशा ठिकाणी ही घरे आहेत. मोक्याच्या जागी असलेल्या या घरांची किंमत ५३ लाख ते एक कोटीपर्यंत ठेवण्यात आली. रेडीरेकनरपेक्षा कमी दर नसतानाही हजारो मुंबईकरांनी सुरुवातीला घरांसाठी नोंदणी केली, मात्र तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. सुरुवातीला अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला. मुदत संपायला चार दिवस शिल्लक असताना फक्त ८५५ अर्जच आले. त्यामुळे घरांना प्रतिसाद कमी असल्याचेच दिसत होते.
शुक्रवारी अंतिम मुदतीपर्यंत अनामत रकमेसह सर्व प्रक्रिया पूर्ण करून २०३७ अर्ज आले. त्यामुळे २० नोव्हेंबरला या अर्जानुसार लॉटरी काढली जाणार आहे. या घरांसाठी मरोळ-अंधेरी पूर्व, गोरेगाव, कांदिवली येथील घरांना बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. मरोळ-अंधेरी पूर्व येथे अल्प उत्पन्न गटासाठी १४ घरे असून, घराची किंमत ७८ लाख इतकी आहे. येथील घरांसाठी तब्बल ९३७ अर्ज आले आहेत. तर गोरेगाव येथील अत्यल्प उत्पन्न गटासाठी ५९ लाख किंमत असलेल्या १९ घरांना १८९ अर्ज तर त्रिलोक पार्क-कांदिवलीतील अल्प उत्पन्न गटासाठी ८१ लाख किंमत असलेल्या चार घरांसाठी ८३ अर्ज आले आहेत. भांडुपला २४० घरे असतानाही येथे फक्त १२९ तर कांजूर येथे २७ घरांसाठी फक्त ५५ अर्ज आले. दहिसर, भायखळा येथील घरांसाठीही फारसा प्रतिसाद मिळालेला नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
२० नोव्हेंबरला सोडत
पात्र अर्जदारांची अंतिम यादी १८ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात आली. २० नोव्हेंबरला सोडत काढली जाईल. या सोडतीतून निवड झालेल्या यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
कोणत्या ठिकाणी किती अर्ज?
प्रेस्टिज भायखळा – ४२ घरांसाठी ११२ अर्ज
एलबीएस मार्ग भांडुप (प.) – २४० घरांसाठी १२९ अर्ज
१६/ए मरोळ-अंधेरी (पू.) – १४ घरांसाठी ९३७ अर्ज
माजासगाव, जोगेश्वरी (पू.) – ४६ घरांसाठी ३९३ अर्ज
त्रिलोक पार्क, कांदिवली (प.) – ४ घरांसाठी ८३ अर्ज
स्वामी विवेकानंद मार्ग, गोरेगाव (पू.) – १९ घरांसाठी १८९ अर्ज
कांदिवली (प.) – ३० घरांसाठी ११५ अर्ज
कांजूर-आदि अल्लूर – २७ घरांसाठी ५५ अर्ज
सागर वैभव सोसायटी, कांदिवली – ४ घरांसाठी २४ अर्ज

