मुंबई विद्यापीठातर्फे ‘इंडिया-जपान टॅलेंट मोबिलिटी प्रोग्राम’चे आयोजन

Published on

मुंबई विद्यापीठातर्फे ‘इंडिया-जपान टॅलेंट मोबिलिटी प्रोग्राम’चे आयोजन
विद्यार्थ्यांना जपानी उद्योगसंस्थांमध्ये रोजगार व संशोधनाच्या संधींचे दालन खुले
मुंबई, ता. १८ : मुंबई विद्यापीठाच्या करिअर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल आणि अल्केश दिनेश मोदी इन्स्टीट्यूट ऑफ फायनान्शिअल मॅनेजमेंट स्टडीज् यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इंडिया-जपान टॅलेंट मोबिलिटी प्रोग्राम’चे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय विद्यार्थ्यांना जपानमधील प्रतिष्ठित उद्योग संस्थांशी जोडणारा हा उपक्रम तंत्रज्ञान, अभियंत्रिकी, व्यवस्थापन आणि नवोन्मेष या क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याला नवी चालना देणार आहे. २०३० पर्यंत भारत-जपान यादरम्यान पाच लाख व्यावसायिकांची गतिशीलता निर्माण करण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टपूर्तीसाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. मुंबई विद्यापीठात प्रथमच जपानी कंपन्यांचा संयुक्त विद्यार्थी-सहभाग कार्यक्रम पार पडणार असून, कलिना संकुलात दुपारी १ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सेमीकंडक्टर्स, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स, तसेच व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये उद्योग-विद्यापीठ सहकार्य वाढविणे आणि प्रतिभाविकास साधणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या उपक्रमात जपान व त्यांच्या भारतातील नऊ अग्रगण्य कंपन्यांमधील २९ प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. यात जेटीबी कॉर्पोरेशन, एनईसी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सुझुकी आर अँड डी सेंटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ग्लोबल प्लॅन इंक., १३६ एलएलसी, डीएनपी प्लॅनिंग नेटवर्क कंपनी लिमिटेड, एआयजीओ कंपनी लिमिटेड, इन्फोब्रिज ग्रुप आणि मार्केट एक्ससेल डेटा मॅट्रिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागांतील आणि सलंग्नित महाविद्यालयातील १५० विद्यार्थी सहभागी होत आहेत. यामध्ये अल्केश दिनेश मोदी इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शिअल मॅनेजमेंट स्टडीज्, जमनालाल बजाज इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज्, गरवारे इन्स्टीट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट, संगणकशास्त्र विभाग, भौतिकशास्त्र विभाग, नॅशनल सेंटर फॉर नॅनोसायन्स अँड नॅनोटेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञान विभाग, ठाणे उपपरिसर तसेच विद्यापीठाशी संलग्न निवडक महाविद्यालयांचा समावेश आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना कंपनी प्रतिनिधींसोबत रोजगार, इंटर्नशिप, कौशल्यविकास आणि संयुक्त संशोधनाच्या संधींबाबत थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. भारत-जपान मानव संसाधन विनिमय कृती आराखड्याशी सुसंगत असा हा कार्यक्रम कौशल्याधारित शिक्षण, रोजगार निर्मिती, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि संशोधनाला प्रोत्साहन देणारा आहे. मुंबई विद्यापीठाने या उपक्रमाद्वारे आपल्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक पातळीवरील विविध संधीचे खुले करत इंडो-जपानी भागीदारी अधिक दृढ करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com