‘कूपर’मधील रुग्णाचा मृत्यू अनैसर्गिक
‘कूपर’मधील रुग्णाचा मृत्यू अनैसर्गिक
मुंबई, ता. १९ : प्रकाश जयवंत परब (वय ५२) हा रुग्ण कूपर रुग्णालयात पहाटे शौचालयाच्या दिशेने जाताना पाय घसरून पडला. त्यानंतर रक्तस्त्राव होऊन त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उशिराने उपचार करण्यात आल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला होता. आता शवविच्छेदन अहवालातून हा मृत्यू अनैसर्गिक असल्याचे समोर आले आहे.
रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, उपचारादरम्यान रुग्णाला शस्त्रक्रियेवेळी जखमेवर टाके मारण्यात आले होते. ऑन-कॉल न्यूरोसर्जन आणि निवासी डॉक्टरांनी तपासणी केली होती. योग्य उपचार दिल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले, मात्र सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. रुग्णालयानेच दिलेल्या शवविच्छेदन अहवालात या रुग्णाचा मृत्यू अनैसर्गिक असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी वेळेवर उपचार न केल्याच्या नातेवाइकांच्या आरोपाची चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

