शताब्दी रुग्णालय टाकतोय कात!
शताब्दी रुग्णालय टाकतेय कात!
सुविधा वाढवणार; नव्या वर्षात अस्थिरोग शस्त्रक्रिया कक्ष
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : गोरेगाव येथील सिद्धार्थ आणि भगवती या दोन रुग्णालयांचा भार सांभाळून कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालय आता आणखी सक्षम होत आहे. येत्या नवीन वर्षात रुग्णालयात अनेक नव्या सुविधांचा लाभ रुग्णांना मिळू शकेल. शताब्दी रुग्णालय कात टाकत असून, नूतनीकरणासाठी गेलेल्या भगवती आणि सिद्धार्थ रुग्णालयातील रुग्णांचा भार जवळपास तीन पटीने वाढला आहे. नव्या वर्षात अस्थिरोग शस्त्रक्रिया कक्ष सेवेत येणार आहे.
केवळ उत्तर मुंबईतील लोकसंख्येचाच नाही, तर पालघर ते दहिसर ते गोरेगावपर्यंतच्या लोकसंख्येचाही समावेश असून, तोही भार शताब्दी रुग्णालयावर आहे. कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात सुरू असलेल्या दुरुस्ती, स्वच्छता आणि विभागनिहाय सुविधा उभारणीला गती मिळत असून, रुग्णसेवा अधिक दर्जेदार करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर मोठे बदल राबवले जात आहेत. ऑपरेशन थिएटरचे नॅशनल एनएबीएच मानदंडांनुसार उन्नतीकरण, वॉर्डांचे नूतनीकरण, स्वच्छता यंत्रणा सुदृढ करणे, वॉशरूमचे मॉड्युलर अपग्रेडेशन, सीसीएसडी विभागाचे सुधारित नियोजन, तसेच उंदरांच्या समस्येसह अनेक तांत्रिक अडथळ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
सिलिंगचे नूतनीकरण
गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उंदराचा सुळसुळाट वाढला होता. कर्मचारी, परिचारिका आणि डॉक्टरांनी केलेल्या तक्रारीनंतर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय गुप्ता यांनी तत्काळ सीलिंगचे नूतनीकरण करून घेतले. वॉर्डांमधील सिलिंग काढून टाकणे, वायरची दुरुस्ती, उंदरांच्या मार्गांचे पूर्ण सिलिंग, स्वच्छतेसाठी वाढीव कर्मचारी, अतिरिक्त कचरा डबे आणि वायुवीजन सुधारणा या कामांचा मोठ्या प्रमाणात अंमल सुरू आहे. पब्लिक वॉशरूमची परिस्थिती खराब असल्याने ती मॉड्युलर पद्धतीने नव्याने बांधण्याचा निर्णय घेतला असून, खालील मजल्यावरील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर तोच नमुना सर्व मजल्यांवर लागू केला जाणार आहे.
वास नियंत्रणासाठी निष्कासित पंखा सुधारित करणे, जलरोधक दुरुस्तीही करण्यात येत आहे. शिवाय रुग्णालयातील खुले असलेले छोटे छोटे बोगदे ही प्लास्टर करून बुजवण्यात आले आहेत. त्यामुळे उंदरांना येण्यासाठी जागा राहिलेली नाही. उघड्यावर अन्न फेकू नये, यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना प्रवृत्त केले जात आहे. स्वच्छतेच्या बाबतीतही कुठलीही तडजोड केली जात नसल्याचे डॉ. गुप्ता यांनी स्पष्ट केले. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकासाठी सार्वजनिक स्वच्छतागृह प्रत्येक मजल्यावर बांधले जाणार आहेत.
अशा असतील सुविधा
रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी स्वतः निरीक्षण करून शस्त्रक्रिया कक्षामध्ये ‘एकच टेबल’ ठेवण्याचा नियम घेतला आहे. योग्य क्षेत्रवार विभागणी, निरोधन (इन्सुलेशन), अग्निरोधक दरवाजा, लाद्या बसवणे, ऊर्जा बचतीचे दिवे, संपूर्ण वातानुकूलित व्यवस्था या सुधारणा पूर्ण झाल्या आहेत. जुन्या कक्षाच्या तुलनेत नवीन शस्त्रक्रिया कक्ष अत्याधुनिक असून, आवश्यक ती सर्व उपकरणे नव्याने बसवण्यात आली आहेत. अस्थिरोग विभागात दररोज ३०० ते ४०० रुग्णांची ओपीडी असल्याने वापर वाढत आहे.
रुग्णालयातील अस्थिरोग शस्त्रक्रिया कक्षाचे नूतनीकरण केले जात आहे. या अत्याधुनिक कक्षाचे काम एका महिन्यात होणे अपेक्षित आहे. येथे दिवसाला किमान १० शस्त्रक्रिया केल्या जातील. भविष्यात अनेक सुविधा सुरू केल्या जातील.
- डॉ. अजय गुप्ता,
वैद्यकीय अधीक्षक, शताब्दी रुग्णालय कांदिवली
क्षमतेपेक्षा तिप्पट भार
- पालघर ते दहिसर ते गोरेगावपर्यंतचे रुग्ण.
- नूतनीकरणासाठी भगवती आणि सिद्धार्थ बंद असल्याने क्षमतेपेक्षा तिप्पट भार व्यवस्थापन.
- अपंगत्व प्रमाणपत्र दिले जाते.
- एचआयव्ही रुग्णांच्या डायलिसिससाठी एक बेड राखीव.
- तोंडाच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया आणि स्तनाच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रिया होतात. ज्या पूर्वी फक्त वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये केल्या जात होत्या.
- जन्मलेल्या बाळांसाठी १६ खाटांचे एनआयसीयू उपलब्ध.
- उपनगरीय रुग्णालयापैकी सर्वाधिक प्रसूती केल्या जातात.
- दिवसाला ४० प्रसूती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

