वाहन चोरांच्या टोळ्या रडारवर!

वाहन चोरांच्या टोळ्या रडारवर!

Published on

वाहन चोरांच्या टोळ्या रडारवर
पाच वर्षांत चोरीच्या सहा हजारांहून अधिक वाहनांचा शोध लागेना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ ः दिल्ली बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी अन्य प्रतिबंधात्मक उपायांसोबत वाहन चोरांच्या संघटित, आंतरराज्य टोळ्यांकडेही लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या पाच वर्षांत शहरातून १३ हजार ३१३ वाहने चोरी झाली आहेत. त्यापैकी सात हजार १८७ वाहने शोधण्यात, हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. उर्वरित सहा हजार १२६ वाहनांचा शोध अद्याप लागलेला नाही. अर्थात वाहनचोरीच्या तब्बल ४७ टक्के गुन्ह्यांची उकल पोलिसांना करता आलेली नाही.

वाहन चोरी गांभीर्याने का घेतली जाते?
- बुधवारी (ता. १९) चारकोप परिसरात एका इस्टेट एजंटवर गोळीबाराची घटना घडली. या घटनेत हल्लेखोर दुचाकीवरून आले, गोळ्या झाडल्या आणि दुचाकीवरूनच पसार झाले. या गुन्ह्याप्रमाणे सोनसाखळी चोरीपासून दहशतवादी हल्ल्यांपर्यंत, प्रत्यक्ष गुन्ह्यात, गुन्ह्याच्या तयारीसाठी आणि पसार होण्यासाठी वाहनांचाच वापर होतो.
- विशेष म्हणजे, गुन्ह्यात वापर होणारी बहुतांश वाहने चोरीची असतात. ती वाहने पोलिसांना सापडलीच तरी त्यावरून पोलिस मूळ मालकापर्यंत पोहोचतात. ती चोरणाऱ्या, गुन्ह्यात वापरणाऱ्या आरोपींपर्यंत पोहोचणे पोलिसांना अवघड असते. तेवढ्या काळात आरोपींना अन्य राज्यात दडण्यास, सीमा ओलांडून परदेशात पसार होण्यास पुरेसा वेळ मिळतो. त्यामुळे वाहन चोरीचा प्रत्येक गुन्हा पोलिसांच्या लेखी भविष्यातील गंभीर घटनेची चाहूल असते.

अशी होते वाहन चोरी...
- वाहन चोरी संघटितरीत्या होते. चोरलेले वाहन लांबलचक साखळीद्वारे एका हाताने दुसऱ्या हाती दिले जाते. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कारवायांनुसार प्रमुख आरोपी किंवा ज्या व्यक्तीकडे सेकंड हँड किंवा स्पष्टपणे चोरीच्या वाहनाची मागणी होते ती व्यक्ती या साखळीद्वारे प्रत्यक्ष कार चोरणाऱ्याला निरोप देतो. हा निरोप स्पष्ट म्हणजे काळ्या रंगाच्या चार इनोव्हा हायक्रॉस, दोन शुभ्र वॅगन आर, अशी रंग, मॉडेलसह स्पष्ट ऑर्डर दिली जाते.
- प्रथम मागणीप्रमाणे शहर, महानगर प्रदेश, राज्यात ही वाहने शोधली, हेरली जातात. त्यानंतर अवघ्या एका सेकंदात कुलूपबंद कारचा दरवाजा उघडणारा आणि पुढल्या काही मिनिटात बनावट चावीने वाहन सुरू करणारा ती कार चोरतो. त्यानंतर हे वाहन शहरात किंवा महानगर प्रदेशात दडवून ठेवले जाते. नवा रंग, बनावट नंबर प्लेट आणि निकड भासल्यास चासी नंबर मिटवून हे वाहन तीन ते चार टप्प्यांमध्ये चालक बदलून प्रमुख आरोपीपर्यंत पोहोच होते. यात वाहन हेरणाऱ्यांपासून ते प्रमुख आरोपीपर्यंत पोहोचवणाऱ्यांची जबाबदारी मर्यादित असते. अनेकदा या व्यक्ती एकमेकांच्या परिचित नसतात.

सांकेतिक भाषा
वाहन चोरांच्या प्रत्येक टोळीत विविध वाहनांना सांकेतिक शब्द वापरला जातो. उदाहरणार्थ स्कॉर्पिओला बिच्छू , वॅगन आरसाठी माचिस.

विशेष कक्ष बरखास्त
कधीकाळी गुन्हे शाखेच्या अखत्यारीत मोटार वाहन चोरीविरोधी पथक कार्यरत होते. या पथकात राज्यातील नव्हे तर देशभरातील प्रत्येक राज्यांत वाहनचोरीची माहिती देणारे खबऱ्यांचे जाळे असलेले अधिकारी, अंमलदार कार्यरत होते. या अधिकाऱ्यांना विविध संघटित टोळ्या आणि त्यांच्या कार्यपद्धतीची इत्थंभूत माहिती होती. विविध राज्यांच्या पोलिसांसोबत त्यांचा समन्वय होता; मात्र कोव्हिड काळात हा विशेष कक्ष बरखास्त करण्यात आला.

या गुन्ह्यात वापर
- उद्योगपती मुकेश अंबानी आणि कुटुंबाला मिळालेली धमकी. हा बनाव तत्कालीन पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी रचला होता. त्यात चोरीच्या वाहनांचा वापर करण्यात आला.
- इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनेने २००८मध्ये गुजरातच्या अहमदाबाद, सुरत शहरांमध्ये सुमारे २१ बॉम्ब (इंप्रोव्हाईज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस) पेरले होते. त्यापैकी काही बॉम्ब फुटले, तर काही फुटण्याआधीच निष्क्रिय केले गेले. यापैकी बहुतांश बॉम्ब व्हॅगन आर आणि तत्सम मोटरगाड्यांमध्ये ठेवून ती वाहने रुग्णालयांबाहेर उभी केली. यातील चार व्हॅगन आर नवी मुंबईतून चोरी करण्यात आल्या होत्या. तत्कालीन एटीएस पथकाने या मोटरगाड्या चोरणाऱ्या मोहम्मद मोईन अब्दुल शकुर खान ऊर्फ इरफान आणि अयुब राजा अमीन शेख या दोन सराईत चोरांना अटक केली. चौकशीत इंडिया मुजाहिद्दीनच्या प्रमुख अतिरेक्यांनी खान याला व्हॅगन आर, मारुती ८०० याच गाड्या चोरण्याची सूचना केली होती. या मॉडेलच्या कार गुजरातमध्ये सर्वाधिक चालतात, त्या गर्दीत या चोरलेल्या कारबाबत कुतूहल, आकर्षण, संशय निर्माण होणार नाही, हा त्यामागील हेतू होता, असे स्पष्ट झाले.


पाच वर्षांतील आकडेवारी

वर्ष वाहने चोरी सापडली

२०२५ १,७१३ ९८६
२०२४ २,५८९ १,४५०
२०२३ २,६७१ १,५६४
२०२२ ३,०५८ १,५८८
२०२१ ३,२८२ १,५९९

शोधण्याचा कसोशीने प्रयत्‍न
गुन्हे शाखेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की वाहन चोरी हा कायमच पोलिस यंत्रणांच्या दृष्टीने गंभीर विषय असतो. अलीकडच्या काळात वाहन चोरी होऊ नये, यासाठी अद्ययावत सुरक्षा प्रणाली वापरली जाते. जीपीएस किंवा मूलतःच वाहन कोठे आहे, याची माहिती देणारी ऑनलाइन प्रणाली अंतर्भूत केली जाते. त्यामुळे वाहनचोरीचे गुन्हे तुलनेने कमी झाले आहेत; मात्र चोरी झालेले प्रत्येक वाहन गंभीर गुन्ह्यात वापरले जाईल, या अनुमानाने ते शोधण्याचा कसोशीने प्रयत्न केला जातो, असे ते म्‍हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com