प्रदूषण राेखण्यासाठी भरारी पथक

प्रदूषण राेखण्यासाठी भरारी पथक

Published on

प्रदूषण राेखण्यासाठी भरारी पथक

मुंबईतील प्रत्येक वाॅर्डात नियुक्ती; उल्लंघन झाल्यास कठाेर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० ः शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. प्रदूषणावर लगाम लावण्यासाठी प्रत्येक वॉर्ड स्तरावर भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. वायू प्रदूषण नियंत्रणासाठी लागू केलेल्या २८ मुद्द्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत.

महापालिकेच्या उपाययोजनांनंतरही संबंधित परिसरातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (एक्यूआय) सातत्याने २००पेक्षा जास्त राहिला, तर त्या भागातील प्रदूषणाला जबाबदार उद्योग आणि बांधकामे ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन ४अंतर्गत बंद केली जाणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. सर्व उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांना या कारवाईवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त (पर्यावरण आणि वातावरणीय बदल) अविनाश काटे यांच्या देखरेखीखाली विविध उपक्रम राबवले जात आहेत. यात प्रमुख उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात स्वच्छ इंधनावर चालणाऱ्या बेकरी व स्मशानभूमीची अंमलबजावणी, सार्वजनिक वाहतूक अधिक पर्यावरणस्नेही करण्यासाठी इलेक्ट्रिक बसचा वापर, बांधकामे आणि राडारोड्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया, रस्त्यांवर मिस्टिंग मशीनद्वारे नियमित पाणी फवारणी इत्यादींचा समावेश आहे. याचबरोबर महापालिकेने १५ ऑक्टोबर २०२४ रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रत्येक बांधकाम प्रकल्पाने पत्र्यांचे कुंपण, हिरवे आच्छादन, वेळोवेळी पाणी फवारणी, धूळ मोजमाप यंत्रणा, धूरशोषक यंत्र इत्यादी सुविधा अनिवार्य आहेत. वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाने नागरिकांना प्रदूषण वाढविणाऱ्या कृतींपासून दूर राहावे आणि प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन केले.
---
अशी असेल यंत्रणा
प्रदूषण नियंत्रणाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात आलेली आहेत. प्रत्येक भरारी पथकात दोन विभागीय अभियंते, एक पोलिस कर्मचारी, व्हेईकल ट्रॅकिंग अँड मॉनिटरिंग सिस्टीम असलेले वाहन यांचा समावेश आहे.
----
जबाबदारी काय?
- पथके बांधकामांसंबंधी नियमांची अंमलबजावणी, सेन्सरआधारित वायू गुणवत्ता मोजणी यंत्रणा तपासणी, कचरा व लाकूड जाळण्यास बंदीची अंमलबजावणी यावर लक्ष ठेवणार आहेत.
- नियमावलीचे उल्लंघन हाेताना दिसल्यास त्वरित कारवाई करण्याची जबाबदारी या पथकांवर असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com