मुंबईत रिफ्लेक्टर नसलेली वाहने सुसाट

मुंबईत रिफ्लेक्टर नसलेली वाहने सुसाट

Published on

मुंबईत रिफ्लेक्टर नसलेली वाहने सुसाट

अवजड वाहनांमुळे अपघाताचा धोका

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २२ ः रस्ते अपघातात सर्वाधिक जीवितहानी होत आहे. जीवघेणे अपघात कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत. यावर लक्ष दिले असता अनेक वाहनांना नसलेले रिफ्लेक्टर अपघाताचे कारण ठरत असल्याचे पुढे आले आहे; मात्र मुंबईत रिफ्लेक्टर नसलेली वाहने सुसाट धावत आहेत. विशेषतः अवजड वाहनांमुळे अपघाताचा धोका आहे.
रस्त्यावर रात्री उभी असणारी ही वाहने यमदूत ठरतात. प्रवास करणाऱ्या इतर वाहनांना रिफ्लेक्टर नसणारे वाहन रात्रीच्या वेळेस जवळ जाईपर्यंत दिसत नाही. त्यामुळे उभ्या वाहनावर वाहन धडकून अपघात होण्याचा प्रकार वाढला आहे. परिवहन विभागातील मोटर वाहन कायद्याच्या कलम १०४ नुसार वाहनाला रिफ्लेक्टर व ब्रेक लाइट असणे आवश्यक आहे.

परिवहन विभागाने १३ मे २०२२ रोजी परिपत्रकाच्या माध्यमातून राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सीमा तपासणी नाके यांना ब्रॅन्ड इगल्स बिझनेस सोल्यूशन यांचेच रिफ्लेक्टर कीट वापरण्याचे निर्देश दिले. इतकेच नव्हे, तर याची नोंद क्यूआर कोड स्कॅन करून ‘महावहन’वर भरणे आवश्यक आहे. सुरुवातीचे काही दिवस या कीटचा वापर आरटीओच्या ट्रॅकवर वाहन तपासणीदरम्यान झाला. नंतर मात्र दलालांनी डुप्लीकेट रिफ्लेक्टर कीट वापरणे सुरू केले आहे.
==
एक हजार रुपये दंड
रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांना दंड केला जातो. सुरक्षित प्रवास व अपघात कमी करण्यासाठी मोटर वाहन कायद्यात तरतूद केली आहे. ज्या वाहनांना रिफ्लेक्टर लावलेले नसतात, त्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. ही कारवाई आरटीओ व वाहतूक पोलिस करतात.
==
रिफ्लेक्टर, रेडियम पट्टीचाही हवा विशिष्ट दर्जा
वाहनांना लावण्यात येणारे रिफ्लेक्टर, रेडियम पट्टी याची गुणवत्ता परिवहन विभागाने निर्धारित केली आहे. त्या गुणवत्तेचेच रिफ्लेक्टर वाहनांना लावणे बंधनकारक आहे. त्यासाठी अशा रिफ्लेक्टरचा पुरवठा करणाऱ्या एजन्सीसुद्धा शासनाने नियुक्त केल्या आहेत.
==
अनेक जण रिफ्लेक्टर लावतच नाहीत
खनिज वाहतूक करणारे हायवा ट्रक, ट्रॉली, मालवाहू ट्रक, ट्रॅक्टर, डम्पर, क्रेन यासह प्रवासी वाहतूक करणारी वाहने या सर्वांनाच रिफ्लेक्टर बसविणे सक्तीचे आहे. त्यानंतरही अनेक जण रिफ्लेक्टर लावत नाहीत.
==
कलर कोडिंगनुसार रिफ्लेक्टर लावणे सक्तीचे
मालवाहू व पॅसेंजर वाहनांवर रिफ्लेक्टर लावणे गरजेचे आहे. रात्री या रिफ्लेक्टरमुळे अंधारात उभे असलेले वाहन दिसून येते. लाल रंग मागे, पांढरा रंग पुढे व पिवळ्या रंगाचे रिफ्लेक्टर बाजूला लावणे आवश्यक आहे.
==
मालवाहू व पॅसेंजर वाहनांना रिफ्लेक्टर आवश्यक आहे. रिफ्लेक्टरमुळे अपघाताचा धोका टाळता येतो. कलर कोडिंगनुसार, रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक आहे. नियम उल्लंघन करणाऱ्या वाहनांना दंड आकारला आहे, असे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com