कवचशिवाय वेगाची परवानगी नाही
‘कवच’शिवाय वेगाची परवानगी नाही
मुंबई-दिल्ली मार्गावर १६० किमी प्रतितास वेगाचा वेध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : मुंबई-अहमदाबाद-दिल्ली या महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर १६० किमी प्रतितास वेगासाठी उभारणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. रुळांची मजबुती, ओव्हरहेड वायर, पुलांची दुरुस्ती अशा बहुतेक कामांना स्वरूप आले आहे. पण आता गाड्यांना पूर्ण वेग देण्यापूर्वी नवी अट समोर आली आहे. स्वदेशी ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन प्रणाली ‘कवच’ कार्यान्वित झाल्याशिवाय १६० किमी वेगाची परवानगी मिळणार नाही.
रेल्वेच्या ‘मिशन रफ्तार’अंतर्गत प्रमुख मार्गांवरील वेगमर्यादा वाढवण्याचा प्रकल्प राबवला जात आहे. मुंबई ते दिल्ली मार्ग १३० वरून १६० किमी प्रतितास करण्याचा प्रस्ताव यात समाविष्ट आहे. हा वेग प्रत्यक्षात दिला गेल्यास मुंबई ते दिल्ली प्रवास वेळ तब्बल तीन तासांनी कमी होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र जास्त वेगात सिग्नल चुकण्याची शक्यता वाढते. त्यामुळे सुरक्षेला सर्वांत प्राधान्य देत कवच यंत्रणा अनिवार्य करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
सुरक्षा प्रथम : सिग्नल चुकला की गाडी थांबवणार कवच
१६० किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या गाडीला केवळ सिग्नलवर अवलंबून ठेवणे धोकादायक ठरू शकते. म्हणूनच कवच या स्वयंचलित सुरक्षा यंत्रणेचा वापर आवश्यक ठरतो. अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञानावर चालणाऱ्या या प्रणालीद्वारे रेल्वे इंजिन आणि सिग्नल यांच्यात सातत्याने माहितीची देवाणघेवाण होत राहते. गाडीने सिग्नल ओलांडल्यास किंवा अतिवेगाने धावत असल्यास ही प्रणाली आपोआप ब्रेक लावते. त्यामुळे अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते, असे सिग्नल अँड टेलिकॉम विभागाने स्पष्ट केले.
शून्य मृत्यू धोरणाकडे वाटचाल
भारतीय रेल्वेने अपघातमुक्त रेल्वे वाहतूक हे ध्येय ठेवत आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारले आहे. रेल्वे मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आरडीएसओने ‘कवच’ ही यंत्रणा विकसित केली आहे. देशभरातील नऊ हजार किमीहून अधिक मार्गांवर ही प्रणाली बसवण्याचे काम सुरू असून, मुंबई ते दिल्ली मार्गाला प्राधान्य देण्यात आले आहे. कवच यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतरच १६० किमी वेगाची परवानगी मिळेल. त्यामुळे या मार्गावर वेगवान प्रवासाची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना काही काळ आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

