मलनिःस्सारणासाठी धारावी-घाटकोपरदरम्यान जलबोगदा
मलनिस्सारणासाठी धारावी-घाटकोपरदरम्यान जलबोगदा
आराखडा, बांधकाम, सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ ः सांडपाणी प्रक्रियेचे आधुनिकीकरण आणि पाण्याच्या पुनर्वापराला चालना देण्यासाठी महापालिका महत्त्वाचा जलबोगदा प्रकल्प राबवत आहे. धारावी मलजलप्रक्रिया केंद्र ते घाटकोपर आणि पुढे भांडुप संकुलापर्यंत प्रक्रिया केलेले पाणी जमिनीखालून नेण्यासाठी जलबोगदा बांधण्याच्या कामाला वेग आला आहे. या कामासाठी आराखडा, बांधकाम आणि सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे.
महापालिकेने वरळी, वांद्रे, मालाड, वर्सोवा, धारावी, घाटकोपर आणि भांडुप येथे एकूण २,४६४ एमएलडी क्षमतेची आधुनिक मलजलप्रक्रिया केंद्रे उभारण्याचे काम सुरू केले आहे. ही केंद्रे कार्यान्वित झाल्यानंतर त्यापैकी १,२३२ एमएलडी पाणी प्रक्रियेने पुनर्वापरासाठी तयार केले जाणार आहे. उर्वरित पाणी दुय्यम प्रक्रियेनंतर समुद्रात सोडले जाईल.
प्रक्रिया केलेले पाणी धारावी- घाटकोपर- भांडुपमार्गे जमिनीखालून जलबोगद्यातून भांडुप संकुलात नेले जाईल. तिथे आधुनिक सुविधांच्या साहाय्याने हे पाणी पिण्यायोग्य करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी माहितीपूर्ण अहवाल आणि तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे.
धारावी ते भांडुप संकुल असा २०.०७ किलोमीटर लांबीचा जलबोगदा दोन टप्प्यांत बांधण्यात येणार आहे. हा बोगदा जमिनीखाली १४० ते १७५ मीटर खोलीवर बोगदा खोदाई यंत्राद्वारे तयार केला जाणार आहे. पॅकेज एकअंतर्गत घाटकोपर ते भांडुप आणि पुढे भांडुप संकुलापर्यंत १.१६१ किलोमीटर बोगद्याचे काम होणार आहे. भांडुप मलजलप्रक्रिया केंद्र आणि भांडुप संकुल येथे शाफ्ट बांधण्यात येणार आहेत. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कंत्राटदारास कार्यादेश देण्यात आला आहे. तसेच प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स लिमिटेड यांची नियुक्ती झाली आहे.
पाणी पुनर्वापराची क्षमता वाढणार
पॅकेज दोनअंतर्गत धारावी ते घाटकोपर यादरम्यान ८.४८५ किलोमीटर लांबीचा बोगदा बांधला जाणार आहे. या भागातही शाफ्ट बांधून टीबीएमद्वारे बोगद्याचे काम केले जाणार आहे. या कामालाही कार्यादेश देण्यात आला आहे. उपप्रमुख अभियंता (पाणीपुरवठा प्रकल्प) यांच्यामार्फत संपूर्ण प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार सेवा देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील पाणी पुनर्वापराची क्षमता वाढणार असून भविष्यातील पाणीटंचाईला मोठा दिलासा मिळणार आहे.

