ऑरेंज गेट-मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाचे खोदकाम

ऑरेंज गेट-मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाचे खोदकाम

Published on

भुयारी बोगद्यांच्या खोदकामास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात
तीन वर्षांत पूर्ण होणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : पूर्वमुक्‍त मार्गासह अटल सेतूवरून आलेल्या वाहनांना वाहतूक कोंडीशिवाय मरीन ड्राइव्ह, कोस्टल रोड, नरिमन पॉइंट परिसरात पोहोचता यावे, यासाठी एमएमआरडीएकडून ऑरेंज गेट-मरीन ड्राइव्ह असा सुमारे साडेनऊ किलोमीटर लांबीचा दुहेरी बोगदा (भुयारी) मार्ग तयार केला जात आहे. त्याच्या खोदकामाला आज टनेल बोरिंग मशीनद्वारे (टीबीएम) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्‍ते सुरुवात झाली.
दाटीवाटीच्या १०० वर्षे जुन्या इमारती, मध्य आणि पश्चिम रेल्वे, मेट्रो-३च्या भुयारी मार्गाखालून हा बोगदा मार्ग जाणार आहे. पुढील तीन वर्षांत हे काम पूर्ण हाेईल. त्यामुळे फोर्ट, नरिमन पॉइंट परिसरातील वाहतूक कोंडी फुटणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक अधिक वेगवान करण्यासाठी एमएमआरडीएकडून मेट्रो, उन्नत मार्ग, सागरी सेतू, भुयारी मार्गाची कामे हाती घेतली जात आहेत. त्याचाच भाग म्हणून एमएमआरडीएने ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह या मुंबई शहरातील भूमिगत रस्त्याचे बांधकाम हाती घेतले आहे. त्यासाठी आवश्यक बोगदा प्रवेशद्वार तयार झाल्यानंतर पुढील कामाला सुरुवात झाली आहे. ‘पूर्वमुक्‍त मार्गावरून उतरल्यानंतर पुढे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे येथे सुरुवातीला उन्नत मार्ग उभारण्याची संकल्पना होती; मात्र दैनंदिन वाहतूक सुरू ठेवून दाटीवाटीच्या वस्तीत काम करणे कठीण होते. त्यामुळे आम्ही मूळ संकल्पना बाजूला ठेवून भुयारी मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, आजपासून प्रत्यक्ष बोगद्याच्या खोदकामाला सुरुवात झाली,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हे काम मोठे आव्हानात्मक असले तरी एमएमआरडीए आणि एल अँड टीने डिसेंबर २०२८पूर्वी पूर्ण करून मुंबईकरांना दिलासा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल शेवाळे, ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमीन पटेल, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार, अश्विनी मुद्गल, आस्तिक पांडे, एमएमओसीएलच्या रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते.
...
७०० इमारतींखालून बोगदा जाणार
ऑरेंज गेट-मरीन ड्राइव्ह हे सुमारे साडेचार किलोमीटरचे अंतर आहे. हा बोगदा जात असलेल्या मार्गावर १०० वर्षांहून जुन्या इमारती असून, त्यांना धक्का न लावता हा बोगदा तयार केला जाणार आहे. तसेच भुयारी मेट्रो-३ च्या ५० मीटर खालून हा बोगदा असणार आहे. त्यामुळे याकडे अभियांत्रिकी चमत्कार म्हणून पाहिले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
...
दुसऱ्या टनेलचे काम लवकरच
या भुयारी मार्गावर सुमारे सव्वातीन किलोमीटरचा एक याप्रमाणे दोन बोगदे असणार आहेत. दोन नियमित आणि एक आपत्कालीन मार्गिका असणार आहेत. त्यापैकी एका टनेलचे काम सुरू झाले असून, दुसऱ्या टनेलच्या खोदकामाची सुरुवात होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
...
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- एकूण खर्च ८,०५६ कोटी
- एकूण लांबी ९.९६ किमी
- दुहेरी बोगद्याची लांबी - ७ किमी
- प्रत्येक बोगद्यात ३.२ मीटर रुंदीचे दोन पदरी रस्ते, एक पदरी आपत्कालीन रस्ता
- तशी वेग मर्यादा ८० किमी
- दोन्ही बोगदे सुरक्षिततेच्या दृष्टीने एकमेकांशी प्रत्येकी ३०० मी. अंतरावर क्रॉसपॅसेजद्वारे जोडणार
...
मुख्य फायदे
- मुंबईतील पूर्व-पश्चिम उपनगरे आणि नवी मुंबई या भुयारी मार्गाद्वारे जोडली जाईल
- प्रवासाचा वेळ १५-२० मिनिटांनी कमी होईल
- इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होईल
- ध्वनी आणि वायुप्रदूषण कमी होण्यास मदत होईल
...
टीबीएमविषयी...
- टीबीएमचे नूतनीकरण आणि पुनर्निर्मितीचे काम स्थानिक पातळीवर केले
- कटर हेड व्यास १२.१९ मीटर
- लांबी ८२ मीटर
- वजन अंदाजे २, ४०० मेट्रिक टन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com