चैत्यभूमीत उसळला भीमसागर

चैत्यभूमीत उसळला भीमसागर

Published on

चैत्यभूमीत उसळला भीमसागर
विविध राज्यांतून अनुयायी दाखल; राजकीय पक्षांचीही तयारी
सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. ५ ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून हजारो आंबेडकरी अनुयायी दादरच्या चैत्यभूमीत दाखल झाले आहेत. शिवाजी पार्क परिसरात राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. कुठे सभेची तर कुठे अन्नदान तर काही ठिकाणी पथनाट्ये सादर करण्यात येत आहेत. 
मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि पंजाब या राज्यांतून मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी दादरमध्ये आले आहेत. आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भीम अनुयायींचा बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा आणि पुस्तके खरेदी करण्याकडे सर्वाधिक कल असतो. आंबेडकरांनी लिहिलेली पुस्तके व दलित चळवळीवर लिहिलेल्या पुस्तकांची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येते. यामध्ये भीम अनुयायींचा सर्वाधिक कल हा ‘भारतीय संविधान’ आणि ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ही पुस्तके खरेदी करण्याकडे असतो. 
महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर १९६९ला पहिल्यांदा  पुस्तक स्टॉल  सुरू केले. नंतर मुंबई पालिकेकडून सुविधा देण्यात आल्या. आता शेकडो स्टॉल झाले आहेत. पुस्तके खरेदीसाठी रात्रीपासून खूप  लोक येतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोट्यवधींची उलाढाल अपेक्षित आहे, असे लेखक ज. वि. पवार यांनी सांगितले. मुंबई महापालिकेने  स्टॉलची  प्रक्रिया सुधारणे  आवश्यक आहे, असे स्टॉलधारक तेजवील पवार यांनी सांगितले.  
==
वाचन हेच खरे अभिवादन!
पीएचडीची विद्यार्थिनी असून सामाजिक संघटनांबद्दल  अभ्यास करीत आहे. महापरिनिर्वाण दिना निमित्ताने विविध संघटनांच्या प्रतिनिधिनींना  भेटता येते. वाचन हेच बाबासाहेबांना खरे अभिवादन आहे, असे विद्यार्थिनी  शर्वरी पवार हिने सांगितले. ४१ वर्षांपासून आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येत आहोत. गायन आणि भजनाच्या माध्यमातून आम्ही बाबासाहेबांना  वंदन करतो, असे अकाेला येथील साहेबराव इंगळे यांनी सांगितले. आम्हाला चालायलाही मुभा नव्हती . आज जे काही आहोत ते बाबासाहेबांमुळेच आहोत. त्यांचे अनंत उपकार आमच्यावर आहेत. आम्ही १९८४ पासून येत आहोत आणि येथे नतमस्तक हाेत आहोत, असे बुलडाणा येथील शाहीर विलास वारे म्हणाले.  
==
नामकरण व्‍हावे!
दादरचे चैत्यभूमी असे नाव द्यावे, याबाबत लक्षवेधी मागणी मी विधान परिषदेत केली होती. त्याबाबत  अद्याप काहीच झाले नाही. हे नामकरण झाले पाहिजे, असे माजी आमदार प्रकाश गजभिये म्हणाले.  

==

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com