कृषी तंत्रज्ञानात ए आयचा वापर लाभदायी
कृषी तंत्रज्ञानात एआयचा वापर लाभदायी
आयएमसी परिसंवादातील मत
मुंबई, ता. ८ : आधुनिक शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर केल्याने चांगले परिवर्तन होत असून, त्यामुळे उत्पादकता वाढते, साधन संपत्तीची गरज कमी होते आणि बाजारपेठांमध्ये जास्त चांगल्याप्रकारे प्रवेश मिळतो, असे इंडियन मर्चंट चेंबरच्या कृषी समितीचे अध्यक्ष अक्षय दोशी यांनी सांगितले.
बी-बियाणांपासून ते कृषी उत्पादने ग्राहकांच्या घरात जाईपर्यंत कृषी क्षेत्रातील एआयचा वापर, याबाबत आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्सने विशेष तज्ज्ञ परिसंवाद आयोजित केला होता. यात कृषी तंत्रज्ञान, धोरणकर्ते आणि गुंतवणूक या क्षेत्रातील तज्ज्ञांनी आपले विचार मांडले. एआयमुळे कृषी क्षेत्रात होत असलेल्या क्रांतीची त्यांनी माहिती दिली. पीक नियोजनापासून ते पुरवठा साखळीचा सुयोग्य वापर करून ग्राहकांना कृषी उत्पादने पोहोचवण्यापर्यंत एआयमुळे होत असलेल्या बदलांची माहिती त्यांनी दिली. एआयमुळे कृषी क्षेत्रात मोठी वाढ होईल, असेही या वेळी सांगण्यात आले.
शेतीमध्ये एआयचा वापर केल्यास पिकाच्या उत्पादनाचा अंदाज, जमिनीचा पोत तपासणे, कृषी व्यवस्थापन या गोष्टी करता येतातच, पण हंगामातील तोटाही लक्षणीयरीत्या कमी करता येतो आणि शेतीपासून ते ग्राहकाच्या ताटापर्यंत कृषी मालाच्या प्रवासाचे व्यवस्थापनही नीट करता येते. या क्षेत्रात डिजिटायझेशन झाल्यामुळे शेतकऱ्यांना सर्वच बाबींचा ताजा तपशील मिळतो. यात हवामान, बाजारपेठा, किंमत, साठवण आणि वाहतूक ही माहिती मिळतेच, पण धोरण आणि गुंतवणुकीच्या परियंत्रणेबाबतही महत्त्वपूर्ण तपशील मिळून कृषी क्षेत्र लाभदायी होईल, असेही सांगण्यात आले.
या तंत्रज्ञानामुळे परंपरागत कृषीमध्ये मोठा बदल होत असून, याचा अंतिमतः लाभ शेतकऱ्यांना होत आहे, असे आयएमसीच्या कृषी आणि अन्न प्रक्रिया समितीचे अध्यक्ष अभय दोशी म्हणाले. या परिसंवादात एमसीएक्स, सलाम किसान, किसान एआय, फायलो, ग्रोक, स्टेम, माणदेश फाउंडेशन आदींनी महत्त्वपूर्ण माहिती देऊन आपल्या तंत्रज्ञानाचे, उपाययोजनांचे, साधनांचे आणि नवकल्पनांचे सादरीकरण केले. एआयचा वापर करून कृषी तंत्रज्ञानाच्या मूल्य साखळीत वाढ होण्याचे उपायही त्यांनी सुचवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

