बहुभाषिक कलिनामध्ये काँग्रेसपुढे जनाधार टिकवण्याचे आव्हान

बहुभाषिक कलिनामध्ये काँग्रेसपुढे जनाधार टिकवण्याचे आव्हान

Published on

बहुभाषिक कलिनामध्ये काँग्रेसपुढे जनाधार टिकवण्याचे आव्हान
- भाजप, शिवसेना ठाकरे गट-मनसेचे आव्हान
मुंबई, ता. १० ः मुंबई महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार अश्रफ आझमी यांना सुमारे तीन हजार मतांचे मिळालेले मताधिक्य आणि त्यानंतर २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही येथील मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार विजयी झाल्याने प्रभाग क्र. १६५ मध्ये काँग्रेसचे वर्चस्व असल्याचे दिसत आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेने केलेली मोर्चेबांधणी आणि शिवसेना ठाकरे गट-मनसे एकत्र येत असल्याचे चित्र असल्याने खुला असलेल्या या प्रभागात वर्चस्व राखण्याचे काँग्रेसपुढे मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे काँग्रेस कशा पद्धतीने रणनीती आखणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठी, ख्रिश्चन आणि मुस्लिमबहुल मतदार असलेल्या या प्रभागात हलाव पूल, मसरानी लेन, ख्रिश्चन गाव, जय अंबिका नगर, कोहिनूर सिटी परिसर या भागांचा समावेश असून, येथे सुमारे ४१ हजार ८५० एकूण मतदार आहेत. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत या प्रभागातून मनसेतून काँग्रेसचे उमेदवार अश्रफ आझमी यांना ६,२६८ मते मिळाली होती, तर भाजपचे उमेदवार केतन बडगुजर यांना ३,४३१ मते मिळाल्याने आझमी यांचा २,८३७ मतांनी विजय झाला होता, मात्र २०१७ नंतर राजकीय उलथापालथ मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत. तेव्हा भाजपसोबत असलेले उद्धव ठाकरे आज विरोधात आहेत, तर त्यांच्याविरोधात असलेली मनसे आज सोबत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट झाल्याने त्यांचा आणि काँग्रेसचा ताळमेळ नाही. त्यामुळे २०१७ मध्ये असलेले चित्र पुरते बदलले असून, कोणता पक्ष कोणाला निवडणूक मैदानात उतरवणार, त्यावर विजयाचे गणित ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून वर्षा गायकवाड यांना शिवसेना ठाकरे गटाची येथे मोठी मदत झाली होती. त्यामुळे कलिना विधानसभा मतदारसंघातून त्यांना चांगले मताधिक्य मिळाले होते, मात्र आता तेच विरोधात उभे असतील, असे चित्र आहे. त्यामुळे काँग्रेसला आपला प्रभाग राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

लोकसभा, विधानसभेतील चित्र
लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून वर्षा गायकवाड यांनी विजय मिळवला होता. त्यांना कलिना विधानसभा मतदारसंघातून ६७ हजार ६३० मते मिळाली होती, तर महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांना ५१ हजार ३२८ एवढी मते मिळाली होती, तर विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय पोतनीस यांना ५९ हजार ८२० तर भाजपचे अमरजीत सिंग यांना ५४ लाख ८१२ मते होती. त्यामुळे पालिका निवडणुकीत शिवसेना-मनसे, भाजपचे मोठे आव्हान काँग्रेससमोर असणार आहे.

२०१७ मधील चित्र
- अश्रफ आझमी (काँग्रेस) - ६,०६८ मते
- केतन बडगुजर (भाजप) - ३,४३१ मते
- श्रीप्रकाश शुक्ला (शिवसेना) - २,७४३ मते

या आहेत समस्या
- विमानतळाजवळ असल्याने झोपड्यांच्या पुनर्विकासावर फनेल झोनमुळे मर्यादा
- मिठी नदीच्या पुरामुळे वस्त्यांमध्ये शिरणारे पाणी
- खुल्या जागेचा अभाव
- वाहतूक कोंडी
- सुसज्ज सार्वजनिक रुग्णालयाची व्यवस्था नसणे
- शौचालयांची अपुरी व्यवस्था

- मुंबईत सर्वत्र पुनर्विकास झपाट्याने होत असतानाही येथील झोपडपट्टी परिसर विमानतळाच्या फनेल झोनमध्ये येत असल्याने झोपडपट्टीचा पुनर्विकास होत नाही. त्यामुळे आम्ही आणखी किती दिवस झोपडीत काढायचे.
- वाल्मिक सातपुते, रहिवासी

कुर्ला डेपो, सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडमुळे हलाव पूल जवळ होणारी जीवघेणी वाहतूक कोंडी कधी फुटणार? मुलांना शाळेत सोडणे, कुर्ला स्‍थानकाकडे जाताना या वाहतूक कोंडीमुळे नकोसे होते.
- जीवन बाघेला, रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com