वैभव ठाकरची रवानगी पोलिस कोठडीत
वैभव ठाकरची रवानगी पोलिस कोठडीत
१.१५ कोटी स्वीकारणाऱ्या पत्नीचा शोध सुरू
मुंबई, ता. ८ : लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी ठग वैभव ठाकरच्या अटकेनंतर त्याच्या पत्नीचा शोध सुरू केला आहे. गुन्हा नोंद झाल्यानंतर वैभवची पत्नी प्रियांका जैन फरार आहे. विशेष म्हणजे वैभव आणि त्याच्या परिवाराने मुंबई महानगर प्रदेशातील अनेकांना अशा प्रकारे फसवले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून शहरातील सराफा व्यावसायिक शैलेश जैन यांची २.८० कोटी रुपयांना फसवणूक केल्याच्या आरोपात रविवारी (ता. ७) पोलिसांनी वैभवला बेड्या ठोकल्या. दंडाधिकारी न्यायालयाने त्याला १२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. फसवणुकीतून प्राप्त रकमेचा विनियोग कसा, कुठे केला हे स्पष्ट करण्यासाठी प्रियांकाची अटक महत्त्वाची असल्याचे तपासाशी संबंधित अधिकाऱ्याने स्पष्ट केले. दरम्यान, शासकीय अधिकाऱ्याची भूमिका वठवण्यासाठी वापरलेली पिवळ्या दिव्यांची वाहने, मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वैर वावर, बनावट शासकीय ओळखपत्रे, आमदाराचा स्वीय सहाय्यक म्हणून विधिमंडळ अधिवेशनाचा बोगस पास याबाबत पुरावे गोळा करण्यासाठी आणि फरार आरोपींच्या अटकेसाठी वैभवची पोलिस कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचा युक्तिवाद सोमवारी पोलिसांनी न्यायालयात केला. या गुन्ह्यात वैभव, प्रियांकासोबत सासरे अरविंद जैन, सासू सुरेखा जैन यांनाही आरोपी करण्यात आले आहे. वैभव आणि त्याच्या परिवाराकडून आर्थिक फसवणूक झालेल्यांनी पुढे यावे, असे आवाहन एल. टी. मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन तडाखे यांनी केले आहे.
आमदार काळेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी सोमवारी (ता. ८) आरोपी वैभवविरोधातील तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. वैभवने काळे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे भासवून अधिवेशनात प्रवेशासाठी आवश्यक असलेला बोगस पास बनवून घेतला होता. ‘सकाळ’च्या माध्यमातून ही बाब उघड होताच या पासवरील नावापुढील स्वाक्षरी आपली नाही, आपण वैभव या व्यक्तीस ओळखत नाही, असे काळे यांनी स्पष्ट केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

