सायन-कोळीवाडा प्रभागात भाजप आणि काँग्रेसमध्ये टक्कर

सायन-कोळीवाडा प्रभागात भाजप आणि काँग्रेसमध्ये टक्कर

Published on

सायन-कोळीवाडा प्रभागात भाजप आणि काँग्रेसमध्ये टक्कर
महिला आरक्षणामुळे राजकीय गणित बदलले
मिलिंद तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : पालिकेचा प्रभाग क्रमांक १७६ हा मुंबई भाजपचे उपाध्यक्ष रवी राजा यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. ते गेली ३० वर्षे येथून जिंकून येत आहेत. यंदा महिला आरक्षणामुळे येथील राजकीय गणित बदलले आहे.
सायन-कोळीवाडा हा मुंबईतील अत्यंत स्पर्धात्मक मतदारसंघ मानला जातो. या प्रभागातील पारंपरिक कोळीवाडी, एसआरए वसाहती, जून्या वसाहती आणि व्यावसायिक भाग यामुळे मतदारसंघ विविध सामाजिक-जातीय गटांनी भरलेला आहे. येथे मराठी, कोळी, दक्षिण भारतीय मतदार मोठ्या संख्येने आहेत. उत्तर भारतीय आणि अल्पसंख्याक मतदारांचा मिश्रित प्रभाव असून, विजयाचे गणित मुख्यत्वे मराठी आणि दक्षिण भारतीय मतदारांच्या हातात आहे.
गेल्या महापालिका निवडणुकीत २०१७ मध्ये रवी राजा केवळ १३६ मतांनी विजयी झाले, त्यांनी शिवसेनेचे गजानन पाटील आणि भाजपचे मुरुगनंतम रामायाह आर यांचा पराभव केला. या प्रभागातील मतसंख्या अंदाजे ३५-४० हजार असून, मतदानाची टक्केवारी सुमारे ४५-५५ टक्के होती. रवी राजांचा दबदबा या प्रभागात फार मोठा आहे.
रवी राजा मूळ काँग्रेसचे नेते असून, त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये प्रवेश केला आणि मुंबईच्या भाजप उपाध्यक्षपदी नियुक्त झाले, मात्र नुकत्याच जाहीर झालेल्या महिला आरक्षण यादीमुळे प्रभाग क्रमांक १७६ महिलांसाठी राखीव झाला, ज्यामुळे रवी राजांसाठी आगामी निवडणूक मोर्चेबांधणी थोडी गुंतागुंतीची ठरत आहे. सायन-कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातील सात महापालिका प्रभागांपैकी सहा महिला राखीव असल्यामुळे आसपासच्या प्रभागांमध्ये स्थानिक पुनर्वसन करणेही आव्हानात्मक झाले आहे.
राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, रवी राजांचा काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या गणेश यादवच्या पराभवामध्ये महत्त्वाचा ठरला. मागील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे अनिल देसाई यांना प्रभाग १७६ मधून चांगले मताधिक्य मिळाले होते; त्यानंतर मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तमिळ सेल्वन यांनादेखील चांगली आघाडी मिळून त्यांचा पाच हजार मतांनी विजय मिळाला. त्यांना रवी राजा यांनी चांगली मदत केली.
या प्रभागातील मतदार अशोक पाटील म्‍हणाले की, येथील सर्वात मोठी समस्या म्हणजे पाणीपुरवठा आणि जुनी पाइपलाइन. त्यामुळे पाण्याची टंचाई जाणवते. रस्तेही खड्ड्यांनी भरलेले आहेत. त्यामुळे वाहन चालवणे अवघड झाले असून, वाहतूक कोंडीदेखील भेडसावते. नगरसेवकांनी यावर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे, असे ते म्‍हणाले.
मतदार अनीता कोळी यांनी सांगितले की, नालेसफाई आणि कचरा व्यवस्थापन अजूनही मोठा प्रश्न आहे. पावसाळ्यात नाले भरतात आणि रस्त्यावर पाणी साचते. सार्वजनिक पथदिवे खराब असल्यामुळे रात्री सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. या समस्या तातडीने सोडविल्या पाहिजेत, अशी मागणी त्‍यांनी केली.


प्रभागातील समस्या :
-अनेक भागांमध्ये जुने पाइपलाइन नेटवर्क असून, गळतीमुळे पाणीपुरवठा अपूर्ण किंवा असमतोल होतो.
-वसाहती आणि जुनी वस्ती यांमध्ये पाणीपुरवठा वेळेवर होत नाही.
- अनेक गल्ल्या व मुख्य रस्ते खड्ड्यांनी भरलेले आहेत.
- पथदिव्यांचा अभाव किंवा खराब स्थिती रात्री सुरक्षा धोक्यात टाकते.
- नालेसफाई आणि कचरा व्यवस्थापन
- सांडपाणी नाल्यांमध्ये नियमित साफसफाई होत नाही; पावसाळ्यात पूरप्रवण भाग वाढतो.
- कोळीवाडा व व्यावसायिक भागांमध्ये वाहतूक कोंडी.
- सार्वजनिक आणि खासगी वाहनांची पार्किंग सुविधा अपुरी.
- सामाजिक आणि इमारतींचे प्रश्न
- जून्या वसाहती, एसआरए वसाहतींमध्ये अपुऱ्या मूलभूत सुविधा
- कोळी समाजाचा पारंपरिक मत्स्यव्यवसाय आणि पुनर्वसन योजनांमधील अडचणी.

२०१७ मधील निकाल
रवी राजा - (काँग्रेस) - ३,८१४
गजानन पद्माकर पाटील - (शिवसेना) - ३,६७८
मुरुगंतम रामायाह आर - (भाजप) - ३,४९५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com