काँग्रेस आणि भाजपमध्ये निकराची लढाई

काँग्रेस आणि भाजपमध्ये निकराची लढाई

Published on

काँग्रेस आणि भाजपमध्ये निकराची लढाई
प्रभाग क्र. १०१ महिलांसाठी आरक्षित
सकाळ वृत्तसेवा ः मयूर फडके
मुंबई, ता. ११ : वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १०१ हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. या प्रभागात सर्व समुदायांचे रहिवासी वास्तव्यास असल्याने त्यांची मते ही गेमचेंजर ठरतात. हा विधानसभा मतदारसंघ आमदार आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांचा गड असल्यामुळे इथे काँग्रेस आणि भाजपामध्ये ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळणार आहे.
मागील २०१७ च्या पालिका निवडणुकीत काँग्रेसच्या आसिफ झकेरिया यांनी भाजपच्या डेरेक टॉकरचा पराभव केला होता. तेव्हा आणि आताची समीकरणे बदलली आहेत. तेव्हा या प्रभागात काँग्रेसचा दबदबा होता. भाजप आणि शिवसेना दोघेही वेगवेगळे लढल्याचा फायदा नकळतपणे काँग्रेसला झाल्याचे बोलले जाते, परंतु यंदाचे चित्र वेगळे आहे. काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात मनसेवरून मतभेद आहेत. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र किती लढतील यावर साशंकता आहे.
शिवसेना आणि मनसेची युती जवळपास निश्चित आहे, परंतु इथे मनसेचा फारसा प्रभाव नसल्यामुळे शिवसेनेचाच उमेदवार मिळण्याची शक्यता आहे, मात्र आता हा प्रभाग महिला (सर्वसाधारण) राखीव झाल्याने शिवसेना आणि भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
 प्रभाग क्र. १०१ मध्ये जवळपास ५० हजार लोकसंख्या आहे. मध्यमवर्गीय ते उच्चभ्रू रहिवाशांचा हा प्रभाग आहे. टर्नर रोड, हिल रोड. एस. व्ही. रोड, सेंट पीटर, चॅपल रोड, पाली रोड, चिंबई, माउंट मेरी रोड इ. ठिकाणे मिळून हा प्रभाग तयार झाला आहे. येथे मराठी, गुजराती, जैन समुदायांचा टक्का सर्वाधिक आहे, तर काही ठिकाणी ख्रिश्चन बांधवांची संख्या अधिक आहे.

प्रमुख समस्या
वाहतूक कोंडी ही या प्रभागातील मुख्य समस्या आहे. या प्रभागात शॉपिंग हब आणि रेस्टॉरंट असल्यामुळे अनेकदा विशेषतः शनिवारी आणि रविवारी खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यातच अनधिकृत फेरीवाल्यांचा सुळसुळाट असल्याने त्यांच्या त्रासात अधिक भर पडतो. रिक्षाचालकांची मुजोरी हा प्रश्न जैसे थे आहे. वांद्रे रेल्वेस्थानकाबाहेर रिक्षाचालकांची अरेरावी दररोजची आहे. वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या वायुप्रदूषणाच्या विखळ्यात हा प्रभाग सापडला आहे.

लोकसभा,  विधानसभेतील चित्र
लोकसभेत महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी भाजपचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला होता, तर विधानसभेत भाजपचे आशीष शेलार यांनी काँग्रेसच्या आसिफ झकेरियांचा पराभव करून विजयाची हॅट्‌ट्रिक साधली होती.

२०१७ मधील निकाल
आरिफ झकेरिया (काँग्रेस) १०,५८७ मतं- विजयी
डेरेक टॉकर (भाजप), ६,५६३ मते
सुनील जाधव (शिवसेना) ३,४३३ मते

निवडणुकीत विजय कोणत्याही पक्षाचा होऊ दे. विजयी उमेदवार त्यानंतर त्या प्रभागात फिरकतसुद्धा नाहीत, हे वास्तव आहे. या प्रभागाचा विचार करता येथेही अनेक समस्या वर्षानुवर्ष तशाच आहेत. आता हा प्रभाग महिलांसाठी असल्याने महिलांच्या समस्यांकडे लक्ष देण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त करतो.
- प्रशांत मिरजुले,
स्थानिक रहिवासी
.......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com