भाजप विरुद्ध शिवसेना सामना रंगणार
भाजप विरुद्ध शिवसेना सामना रंगणार
प्रभाग क्रमांक ४३ मध्ये कोण बाजी मारणार?
नितीन जगताप ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ ः मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४३ मध्ये निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यंदा भाजप विरुद्ध शिवसेना सामना रंगणार आहे.
२०१७ मध्ये या प्रभागात सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर लढत दिली होती. त्या वेळी झालेल्या पंचरंगी लढतीत भाजपचे उमेदवार विनोद मिश्रा यांनी उत्तम संघटनशक्ती व प्रचाराच्या जोरावर विजय मिळवला होता.
मिश्रा यांना ५,६२० मते मिळाली होती, तर त्यांच्या जवळच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या राठोड भोमसिंग हिरसिंग यांना ४,९११ मते मिळाली होती. काँग्रेसचे अजित रावराणे यांना ४,८८२ मते मिळाल्यामुळे तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये चुरशीची लढत झाली होती; मात्र यंदाची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. एकीकडे आघाडीचे अद्याप ठरले नाही तर भाजपचा उमेदवार तयार असल्याने भाजपला त्याचा फायदा होऊ शकतो.
शिवसेना आणि मनसे यांचा एकत्र लढण्याचा निर्णय झाला तर त्याचा थेट फटका भाजपला बसू शकतो. युतीमुळे विरोधी मतांचे विभाजन कमी होण्याची शक्यता आहे, ज्याचा फायदा आघाडीला मिळू शकतो. दुसरीकडे, काँग्रेसने शिवसेनेसोबत युती न करण्याचा निर्णय घेतल्यास काही प्रमाणात मतविभाजन होऊ शकते. त्यामुळे स्थानिक स्तरावर विजयी समीकरणावर परिणाम होईल. प्रभाग क्रमांक ४३ मधील भाजपचे माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांचे व्यक्तिमत्त्व आणि जनसंपर्क या निवडणुकीत जिंकण्यासाठी निर्णायक ठरू शकतो; मात्र २०१७ प्रमाणे स्पष्ट आघाडी घेणे या वेळी सोपे राहणार नाही. स्थानिक पातळीवरील असंतोष, विरोधी पक्षांचे एकत्र येणे आणि मतदारांची बदललेली मनोवृत्ती यामुळे भाजपला जागा राखण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील, हे निश्चित आहे. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि राजकीयदृष्ट्या निर्णायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
लोकसभा, विधानसभेतील चित्र
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र वायकर हे विजयी झाले. तर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे (ठाकरे गट) उमेदवार सुनील प्रभू सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहे. २०१७च्या महापालिका निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये असलेले राजहंस सिंह हे भाजपमध्ये आले आहेत. त्याचाही भाजपला फायदा होऊ शकतो.
२०१७ मध्ये मिळालेली मते
विनोद मिश्रा, भाजप - ५,६२० मते
भोमसिंग राठोड, शिवसेना (ठाकरे गट)- ४,९११ मते
अजित रावराणे, काँग्रेस - ४,८८२ मते
राजकीय उलथापालथी
२०१७च्या निकालानंतर राजकीय उलथापालथ झाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. त्यांचे अनेक कार्यकर्ते विभागले गेले आहेत. मनसेचे जुने कार्यकर्ते आजही निष्ठावान असून राजकीय वादळातही प्रभागात मनसेचा जनाधार टिकून आहे.
प्रमुख समस्या
इमारत पुनर्वसन, रस्त्यावर दुहेरी पार्किंग, वाहतूक कोंडी या प्रमुख समस्या सोडवण्याचे काम निवडून आलेल्या लाेकप्रतिनिधीला करावे लागणार आहे.
मतदारांच्या प्रतिक्रिया
रहिवासी केरूबा कट्टे म्हणाले, की प्रभाग क्रमांक ४३ मध्ये स्थानिक नगरसेवक विनोद मिश्रा यांनी मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत. तसेच अनेक कामे प्रगतिपथावर आहेत. त्यांना चांगला प्रतिसाद मिळेल.
रहिवासी नम्रता शिंदे म्हणाल्या, प्रभागाचा विकास झाला पाहिजे. स्वच्छतेवर जास्त भर दिला पाहिजे. नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे नालेसफाई केली पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

