आता घरातच बोगस कॉल सेंटर

आता घरातच बोगस कॉल सेंटर

Published on

आता घरातच बोगस कॉल सेंटर
देशी-विदेशी नागरिकांची आर्थिक फसवणूक रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ ः देशी-विदेशी नागरिकांना भीती, प्रलोभने दाखवून आर्थिक गंडा घालणारी बोगस कॉल सेंटर भविष्यात पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरतील, हे स्पष्ट करणारे वास्तव बुधवारी (ता. १०) गुन्हे शाखेने अंधेरी येथे केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले.
आतापर्यंत ही बोगस कॉल सेंटर शहरातील विशेषतः पश्चिम उपनगरातील औद्योगिक वसाहतींजवळ व्यावसायिक संकुलात उभारली जात. गुन्हे शाखेने केलेल्या ताज्या कारवाईत मात्र आरोपींनी निवासी इमारतीतील भाड्याने घेतलेल्या दोन सदनिकांमध्ये बोगस कॉल सेंटर सुरू केले होते. पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांची नजर चुकवून फसवणुकीचे उद्योग बिनबोभाट सुरू ठेवण्यासाठी भामट्यांची ही नवी शक्कल असावी, असा अंदाज गुन्हे शाखेचे अधिकारी वर्तवतात.
भविष्यात अनेक व्यक्तींनी एकाच जागी एकत्र येऊन कॉल सेंटर चालवण्याऐवजी आपापल्या घरी बसून, कॅफे शॉपमधून किंवा पालिकेचे बगीचे, समुद्रकिनाऱ्यावर बसून, ही भामटे देशी, विदेशी नागरिकांना फसविण्यासाठीची धडपड सुरू ठेवू शकतील. अशा परिस्थितीत फसवणुकीचे चक्र थोपवणे सुरक्षा यंत्रणांसाठी मोठे आव्हान ठरेल, अशी चिंताही पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी वर्तवतात.

ताजी कारवाई
अंधेरीच्या जेबी नगर येथील अखंड आनंद सोसायटी आणि राजस्थानी कॉलनी येथे ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट आणि ड्रग्ज इन्फोर्समेंट ॲडमिनिस्ट्रेशन या यंत्रणेतील अधिकारी असल्याचे भासवून अमेरिकेतील नागरिकांना फसवण्याची धडपड सुरू होती. या कारवाईत नऊ तरुणांना अटक करण्यात आली, तर ११ लॅपटॉप, ११ हेडफोन, १८ मोबाईल फोन, १ स्विच, २ राउटर आणि विविध कागदपत्रे असा एकूण किंमत ४,७२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

असा चालतो फसवणुकीचा उद्योग
कॉल सेंटर चालक प्रथम देशी-विदेशी विशेषतः अमेरिकेतील नागरिकांचे तपशील डार्क वेबवरून मिळवतात. इंटरनेटद्वारे (वीओआयपी) त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा उभारतात. बेरोजगार मात्र सुशिक्षित, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेल्या तरुणांना कॉलर म्हणून नोकरीवर ठेवतात. या प्रत्येक कॉलरला अमेरिकन नागरिकांशी तेथील लहेजात बनावट नावे कसा संवाद साधावा, याचे प्रशिक्षण देतात. त्यानंतर या कॉलरकरवी व्हायग्राप्रमाणे उत्तेजक प्रतिबंधित औषधांची विक्री, निरनिराळ्या तांत्रिक सेवा पुरविण्याची विनंती, सुरक्षा यंत्रणेतील अधिकारी असल्याचे भासवून कारवाईचा धाक दाखवून पैसे वळते करण्यास भाग पाडतात.

अमेरिकन नागरिकच का?
बहुतांश बोगस कॉल सेंटर अमेरिकन नागरिकांना गळाला लावण्यासाठी धडपडत असतात. कारण त्यांच्याकडून डॉलरच्या स्वरूपात चलन मिळते. शिवाय अशाप्रकारे फसवणूक झाल्यास येथील नागरिकांना विमा योजनेतून ती रक्कम परत मिळते. त्यामुळे तक्रारींचे प्रमाण शुल्लक असते. शिवाय तक्रार झालीच तरी सातासमुद्रापार तपास आपल्या दिशेने येण्याची शक्यता धूसर असते. त्यामुळे फसवणुकीचे मूळ लक्ष्य अमेरिकेतील नागरिक असतात, असे निरीक्षण गुन्हे शाखेतील अधिकारी नोंदवतात.

अर्थकारण
अशी कॉल सेंटर सुरू करण्यासाठी येणारा खर्च मर्यादित आणि फायदा अनेक पटीने होतो. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या महानगरांमध्ये अशा प्रकारच्या बोगस कॉल सेंटरना पेव फुटले आहे.

कॉल सेंटर चालकांची बैठक
बोगस कॉल सेंटर फायदेशीर असल्यानेच अँटेलिया प्रकरणात अटक झालेल्या एका पोलिस अधिकाऱ्याने शहरात सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटर चालकांची चक्क बैठक घेतली. कानाडोळा करण्यासाठी प्रत्येकाकडे ठराविक रक्कम ॲडव्हान्स म्हणून मागितले. विशेष म्हणजे ही कॉल सेंटर ज्या ज्या भागात सुरू होती, येथील स्थानिक पोलिस, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना कारवाई न करण्याबाबत दमही भरला होता.

इगतपुरी प्रकरण
ऑगस्ट महिन्यात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) इगतपुरी येथील रिसॉर्टमध्ये छापा घालून बोगस कॉल सेंटर उद्‌ध्वस्‍त केले. या छाप्यात सुमारे ६२ कॉलर आणि त्यांचे सहकारी सापडले. एक कोटींची रोकड, अर्धा किलो सोने आणि अन्य तांत्रिक उपकरणे, सामग्री जप्त करण्यात आली. या कॉल सेंटरमध्ये काही उच्च पदस्थ शासकीय अधिकाऱ्यांची भागीदारी असल्याचे उघड झाले असून, याबाबतचा तपास सुरू आहे. याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानेही (ईडी) सामानंतर तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com