काळा घोडा परिसराचे रूप पालटणार
काळा घोडा परिसराचे रूप पालटणार
सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात; आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून पाहणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : दक्षिण मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या ऐतिहासिक ‘काळा घोडा’ परिसराचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच हा परिसर मुंबईकरांसह देश-विदेशातील पर्यकांसाठी नव्या रूपात खुला होणार आहे. या कामांचा आज (ता. ११) महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि माजी मुख्य सचिव नितीन करीर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला.
काळा घोडा परिसरातील डॉ. व्ही. बी. गांधी मार्ग, रुदरफोर्ड मार्ग आणि बी. भरूचा मार्ग या ठिकाणचे काम पूर्णत्वास येत आहे. या पाहणी दौऱ्यात सहाय्यक आयुक्त (ए विभाग) जयदीप मोरे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या परिसराचे सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी येथील सर्व उपाहारगृहे, दुकाने आणि दालनांच्या पाट्या एकाच आकाराच्या आणि विशिष्ट नियमावलीनुसार असाव्यात, जेणेकरून परिसराच्या सौंदर्यात एकवाक्यता येईल, अशा सूचना भूषण गगराणी यांनी या वेळी दिल्या.
‘हेरिटेज वॉक’चा आनंद द्विगुणित होणार
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेल्या ‘व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट डेको’ इमारतींना लागूनच हा परिसर आहे. पर्यटकांना ‘हेरिटेज वॉक’चा मनमुराद आनंद घेता यावा, यासाठी साईबाबा मार्ग, रोप वॉक लेन, डॉ. व्ही. बी. गांधी मार्ग, रुदरफोर्ड स्ट्रीट आणि बी. भरुचा मार्ग या पाच रस्त्यांचे एकूण ५०० मीटर लांब सुशोभीकरण करण्यात येत आहे. यासाठी तब्बल तीन हजार ४४३ चौरस मीटर क्षेत्रफळावर विशेष काम करण्यात आले आहे.
काय आहे विशेष?
* भव्य प्लाझा : बी. भरुचा मार्गावरील चौकात एका भव्य ‘प्लाझा’ची निर्मिती करण्यात येत आहे. येथे टेबल-खुर्चीची व्यवस्था असेल, जिथे बसून पर्यटक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकतील.
* आकर्षक पदपथ : करडा आणि काळा ग्रॅनाईट तसेच बेसॉल्ट दगडांचा वापर करून वळणदार आणि देखण्या पायवाटा तयार करण्यात आल्या आहेत.
* वाहतूक बदल : पादचाऱ्यांना मुक्त वावरता यावे, यासाठी परिसरात अवजड वाहनांना बंदी असेल आणि सुरक्षिततेसाठी अद्ययावत बॅरिकेड्स लावले जातील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

