ऐतिहासिक वांद्रे तलावाला नवसंजीवनी
ऐतिहासिक वांद्रे तलावाला नवसंजीवनी
१५ कोटींच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाचा मार्ग मोकळा; १८ महिन्यांत पूर्ण होणार काम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ ः पश्चिम उपनगरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि वांद्रे तलाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एच/पश्चिम विभागातील स्वामी विवेकानंद सरोवराचे रूप लवकरच पालटणार आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) निर्देशानुसार जलाशयांचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि तलावाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महापालिकेने पाऊल उचलले आहे. या कामासाठी मे. डब्ल्यूटीई इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. या कंपनीची निवड करण्यात आली असून, या प्रकल्पासाठी सुमारे १५ कोटी १३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
या कामासाठी सुरुवातीला १५ कोटी ६० लाखांचे कार्यालयीन अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. निविदा प्रक्रियेत मे. डब्ल्यूटीई इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. या कंपनीने स्पर्धात्मक दर सादर केले. त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या वाटाघाटीअंती कंत्राटदाराने आपल्या मूळ किमतीत आणखी १० लाख ४० हजारांची कपात केली. त्यामुळे आता करांसहित या कामाचा एकूण कंत्राट खर्च १५ कोटी १३ लाख ३० हजार २३१ रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेच्या अंदाजित खर्चापेक्षा कमी दरात हे काम होणार आहे.
या प्रकल्पावर देखरेख ठेवण्यासाठी आणि तांत्रिक मार्गदर्शनासाठी मे. शशांक मेहेंदळे अँड असोसिएटस् यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, पर्यावरणीय बाबींसाठी डॉ. मिलिंद कुलकर्णी आणि डॉ. प्रशांत भावे यांची तज्ज्ञ म्हणून मदत घेतली जाणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारण्याचा अनुभव असलेल्या मे. डब्ल्यूटीई इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीकडे या कामाची जबाबदारी सोपवण्यात आल्याने वांद्रे तलाव लवकरच प्रदूषणमुक्त होऊन पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
वांद्रे तलाव हा ६.१८ एकर क्षेत्रफळावर पसरलेला असून, ती ‘हेरिटेज ग्रेड-२ बी’ म्हणून नोंदणीकृत वास्तू आहे. तलावाचे पुनरुज्जीवन करणे, सांडपाणी रोखणे आणि पुढील तीन वर्षांसाठी तलावाचे प्रचालन व परिरक्षण करण्यात येणार आहे. पावसाळा वगळून १८ महिन्यांत हे काम पूर्ण करणे बंधनकारक आहे.
प्रदूषण रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल
राष्ट्रीय हरित लवादाने सांडपाण्यावर १०० टक्के प्रक्रिया करण्याचे आणि जलाशयांचे प्रदूषण रोखण्याचे निर्देश दिले आहेत. वांद्रे तलावामध्ये आजूबाजूच्या परिसरातून येणारे सांडपाणी आणि मलप्रवाह मिसळत असल्याने तलावाचे पाणी दूषित होत होते. हे प्रदूषण रोखण्यासाठी आणि तलावाचे जतन करण्यासाठी अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम तत्त्वावर हे काम हाती घेण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

