राज्यातील कृषी विद्यापीठांत शिक्षकांची वानवा

राज्यातील कृषी विद्यापीठांत शिक्षकांची वानवा

Published on

राज्यातील कृषी विद्यापीठांत शिक्षकांची वानवा

चार विद्यापीठांत सात हजारहून अधिक पदे रिक्त

संजीव भागवत : सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. ११ ः राज्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला), वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी) आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली) या चार कृषी विद्यापीठांत तब्बल सात हजार १९९ शिक्षक आणि शिक्षकेतरांची पदे रिक्त आहेत. या जागांवरील कार्यभार कंत्राटी तत्त्वावरील शिक्षक, अधिकारी यांच्यामार्फत सुरू असल्याची माहिती कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली.

विधान परिषदेचे सदस्य शिवाजीराव गर्जे, शिक्षक आमदार विक्रम काळे आदींनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील उत्तरात मंत्री भरणे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे सद्यःस्थितीत २,२३५ इतकी पदे रिक्त आहेत. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत शिक्षक व शिक्षकेतर संवर्गातील एकूण सात हजार १९९ पदे रिक्त आहेत.
या रिक्त पदांचा कार्यभार इतर कार्यरत शिक्षकवर्गीय, शिक्षकेतर अधिकारी, कर्मचारी यांना देऊन, तसेच कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून विद्यापीठांचे कामकाज प्रभावी पार पाडले जात असल्याची माहिती दिली. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या आस्थापनांवरील पदांचा आकृतिबंध अद्ययावत करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार या विभागाकडून वित्त विभागाकडे आकृतिबंध मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. मंजुरीनंतर शासनाच्या पदभरतीविषयक धोरणानुसार रिक्त पदे भरण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती भरणे यांनी लेखी उत्तरात दिली.
--
महत्त्वाची पदे रिक्त
मंत्री भरणे यांनी आपल्या उत्तरात महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे अध्यक्षपद रिक्त नाही. या परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष आपणच असल्याचे सांगून त्यांनी कृषी विभागाच्या सेवा प्रवेश मंडळाचे अध्यक्षपद सद्यःस्थितीत रिक्त असल्याचे उत्तरात कबूल केले.
--
सुधारित अभ्यासक्रम
कृषी विद्यापीठांत सहाव्या अधिष्ठाता समितीच्या २०२४-२५मधील अहवाल आणि त्यांनी केलेल्या शिफारशीनुसार राज्यातील सर्वच कृषी विद्यापीठांत सुधारित अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com