७० टक्के लोक जास्त वजनामुळे निराश
७० टक्के लोक लठ्ठपणाने निराश
तरुणांमध्ये समस्या; सर्वेक्षणातून समोर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : देशातील ७० टक्क्यांपेक्षा अधिक लोक त्यांच्या लठ्ठपणामुळे नैराश्येचा सामना करत आहेत. ही समस्या विशेषतः तरुणांमध्ये दिसून आली. त्यांचा बीएमआय सरासरीपेक्षा जास्त आहे, अशी माहिती १४२ स्थूल व्यक्तींच्या सर्वेक्षणातून समोर आली.
मेटाहील लॅपरोस्कोपी आणि बॅरिएट्रिक सर्जरी सेंटरने केलेल्या एका अभ्यासात असे दिसून आले की लठ्ठपणाशी झुंजणाऱ्या व्यक्ती समाजातील नकारात्मक बोलणे मनावर घेतात. हे लोक स्वतःलाच दोष देऊ लागतात. त्यामुळे नैराश्य, चिंता, दुःख, आत्मविश्वास कमी होणे, स्वतःच्या शरीराविषयी नकारात्मक भावना, आहाराच्या चुकीच्या सवयी आणि मानसिक आरोग्याची गुणवत्ता कमी होणे अशा गोष्टींशी त्यांचा संबंध दिसून येतो.
अशा विचारसरणीच्या लोकांना व्यायामात कमी रस असतो. निरोगी आहाराचे पालन करण्याची शक्यता त्यांच्यात कमी असते. तसेच वजन कमी झाल्यानंतर अनेकदा ते परत वाढते. त्यामुळे डॉक्टर सांगतात की या नकारात्मक भावना वेळीच ओळखणे आणि त्या दूर करणे गरजेचे आहे. ‘द बर्डन फ्रॉम विदिन- ऑन इंडियन पायलट स्टडी ऑन वेट बायस इंटरनलायझेशन’ शीर्षक असलेला हा अभ्यास आयएफएसओच्या आंतरराष्ट्रीय जर्नल, ओबेसिटी सर्जरीमध्ये प्रकाशित झाला.
नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्समधील एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. तेजल लाठिया म्हणाल्या की, लठ्ठपणा हा एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण आरोग्य प्रवासावर परिणाम करतो.
सैफी आणि एच. एन. रिलायन्स हॉस्पिटल्समधील एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. शेहला शेख म्हणाल्या की, लठ्ठपणा जसजसा वाढतो तसतसा आत्मविश्वास कमी होतो.
कसे केले सर्वेक्षण
- एकूण १४२ व्यक्तींचा यात समावेश होता.
- ७८.९ टक्के महिला सहभागी झाल्या होत्या.
- सहभागींचा बीएमआय २७.५ किंवा त्याहून अधिक होता.
- वजन बायस इंटरनलायझेशन स्केल वापरून चाचणी करण्यात आली.
- ७१.१ टक्के लोकांचा स्वतःच्या वजनाबद्दल तीव्र नकारात्मक दृष्टिकोन पाहायला मिळाला.
- तरुणांमध्ये आणि जास्त बीएमआय असलेल्यांमध्ये ही भावना आणखी स्पष्ट होती.
सर्वेक्षणाचा निष्कर्ष
- ७१.१ टक्क्यांपेक्षा अधिक सहभागींचे गुण न्यूट्रल पॉइंटपेक्षा अधिक होते. याचाच अर्थ त्यांच्यात स्वतःबद्दलची नकारात्मक भावना उच्च पातळीवर आढळली.
- ७४.६ टक्के लोकांना त्यांच्या वजनामुळे नैराश्येची भावना सतावतेय.
- निम्म्याहून अधिक लोक स्वतःच्या शरीरयष्टीस कमी आकर्षक मानतात.
- एक तृतीयांशपेक्षा अधिक लोकांना त्यांच्या क्षमतेवर शंका होती.
- निम्म्याहून अधिक लोकांना त्यांच्या शरीराचा तिरस्कार वाटला आणि त्यांनी त्यांच्या वजनावर आधारित स्वतःचे मूल्यांकन केले.
- ४५.८ टक्के लोकांना वाटते की एक आकर्षक व्यक्ती त्यांच्याशी संबंध ठेवू इच्छिणार नाही.
- निम्म्या लोकांना वाटते की जास्त वजनामुळे त्यांना चांगल्या सामाजिक जीवनाचा अधिकार नाही.
लठ्ठपणामुळे लहापणापासूनच त्या व्यक्तीला टोमणे आणि शरीरयष्टीवरून विनोद केला जातो. सोशल मीडियावरील मीम्स आणि विनोदांमुळे परिस्थिती आणखी वाईट झाली आहे. शिवाय, जागतिक सौंदर्य मानकांच्या (अंगाने बारीक, रंगाने गोरा) या भावनेमुळे महिलांना याचा सर्वाधिक त्रास होतो.
- डॉ. अपर्णा गोविल भास्कर, बॅरिएट्रिक सर्जन, मेटाहिल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

