पर्जन्यजल वाहिनी अपघातप्रवण विभागांना दिलासा
पर्जन्यजल वाहिनी अपघातप्रवण विभागांना दिलासा
तातडीच्या कामांना गती; १० कोटींचे दुरुस्ती काम मार्गी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : शहर विभागातील परळ, सायन, माटुंगा, वरळी, प्रभादेवी आणि दादर विभागांतील पर्जन्यजल नाले कोसळणे, रस्त्याखालील पोकळी निर्माण होणे, जुन्या ड्रेन कोसळणे यांसारख्या अपघातसदृश घटना वाढल्या आहेत. या घटनांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी १० कोटी रुपयांची मोठी स्थापत्य कामे केली जाणार आहेत. यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
महापालिकेच्या ई-निविदा प्रक्रियेत मे. रिओना एंटरप्रायझेस यांनी सर्वात कमी म्हणजे उणे ३२.४० टक्के दर देत ही निविदा जिंकली आहे. महापालिकेने महाटेंडर पोर्टलद्वारे शहर विभागातील अपघातप्रवण ठिकाणांसाठी तातडीचे कामे करण्यासाठी १० कोटी रुपयांच्या कंत्राटासाठी ३-लिफाफा पद्धतीने निविदा मागविल्या होत्या. यास प्रतिसाद म्हणून एकूण चार कंत्राटदारांनी निविदा सादर केली. रिओना एंटरप्रायझेसने सर्वात कमी ६.७६ कोटींचा प्रस्ताव दिला आहे, तर महापालिकेचा कार्यालयीन अंदाज १० कोटी रुपये इतका होता. उपमुख्य अभियंता (पजवा) यांनी केलेल्या विश्लेषणानुसार रिओना एंटरप्रायझेसचा दर रास्त व महापालिकेस फायद्याचा असल्याचे नमूद केले आहे.
कामासाठी पावसाळ्यासह १२ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. कंत्राटासाठी प्रशासकांची मंजुरी आवश्यक आहे. कंत्राटाची एकूण किंमत ८,२९,५८,७२० इतकी प्रस्तावित आहे. महापालिका अधिनियम १८८८ नुसार कंत्राट मंजुरीसाठी प्रशासक यांची परवानगी आवश्यक आहे.
दुर्घटनांवर नियंत्रण
पर्जन्यजल नाल्यांच्या भिंती कोसळणे, भूमिगत पाइपलाइनजवळ रस्ता खचून पोकळी निर्माण होणे, जुन्या ढापा अचानक कोसळणे या समस्या तातडीने सोडवण्यासाठी कामे केली जाणार आहेत. या कामांमुळे मुसळधार पावसात वारंवार उद्भवणाऱ्या दुर्घटनांवर नियंत्रण येण्यास मदत होणार आहे.

