प्राचीन जगातील नात्यांची कहाणी ‘नेटवर्क्स ऑफ द पास्ट’ प्राचीन जगातील नात्यांची कहाणी ‘नेटवर्क्स ऑफ द पास्ट’
प्राचीन जगातील नात्यांची कहाणी ‘नेटवर्क्स ऑफ द पास्ट’
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात खुले झाले नवे दालन; प्राचीन भारताची जगाशी असलेली सांस्कृतिक, व्यापारी आणि वैचारिक नाळ उलगडणार
सकाळ वृत्तसेवा ः मयूर फडके
मुंबई, ता. १३ ः भारताच्या प्राचीन इतिहासात समृद्ध नागरी जीवन असलेल्या हडप्पा, मोहेंजोदडो, धौलावीरा, लोथल या ठिकाणचं ऐतिहासिक साधर्म्य ग्रीक, रोमन, इजिप्त आणि हडप्पा इतिहासाशी आहे. याच इतिहास उलगडणारे दालन मुंबईकरांच्या भेटीला आले आहे.
सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन जगाचा एकमेकांशी असलेला परस्परसंबंध व्यापार, लेखन, धर्म, कला आणि विचारांच्या देवाणघेवाणीमुळे कसा घडला, त्याची ओळख करून देणारे ‘नेटवर्क्स ऑफ द पास्ट : अ स्टडी गॅलरी ऑफ इंडिया अँड द एन्शंट वर्ल्ड’ हे नवीन दालन छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने सुरू केले आहे. या उपक्रमाद्वारे प्राचीन भारताची जगाशी असलेली सांस्कृतिक, व्यापारी आणि वैचारिक नाळ उलगडणार आहे.
या संस्कृतींमध्ये प्राचीन काळापासून आर्थिक, व्यापारिक, सांस्कृतिक देवाणघेवाण होत होती, या दोन्ही ठिकाणची कृषी आणि कृषक परंपरा, भांडी, शस्त्रं, वापराच्या वस्तू, मुद्रा, दागिने, नाणी, वस्त्रं यांच्यात बहुतांश साम्य आढळते. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आणि काहीवेळा तर मृत्यूनंतरही वापरात येणाऱ्या वस्तू सारख्याच असल्याचे आढळले आहे. ब्रिटिश म्युझियमसह बर्लिन, झुरिच, अथेन्स, कुवेत यांसारख्या महत्त्वाच्या संग्रहालयांनीदेखील या उपक्रमासाठी वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत. भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय आणि देशातील अनेक संग्रहालयांचाही या उपक्रमात सहभाग आहे. या प्रकल्पावर गेले चार वर्षे काम करण्यात आले असून गेट्टी कंपनीच्या ‘शेअरिंग कलेक्शन्स प्रोग्रॅम’ने या उपक्रमाला सहकार्य केले आहे.
हडप्पा संस्कृतीकालीन धौलावीराची प्रतिकृती दालनाच्या मध्यभागावर हडप्पा संस्कृतीकालीन शहराची प्रतिकृती ठेवण्यात आले असून तेव्हाची जलयोजना, बंधारे, वस्त्या, इमारती, पाण्याचा, मलनिस्सारण, निचऱ्याची व्यवस्था, दळणवळण अशा सर्व गोष्टी यामध्ये दाखवल्या आहेत. सिंधू संस्कृतीत वापरली जाणारी आणि धोलाविरा उत्खननात सापडलेली १० विशाल चिन्हांची प्रतिकृतीचाही समावेश आहे. या चिन्ह्यांविषयी अजूनही उलगडा झालेला नाही. ही प्रतिकृती जेजे स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी बनवली आहे.
प्राचीन महाराष्ट्राचे दर्शन
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमधूनदेखील पुरातन वस्तू, शिलालेख इथे प्रदर्शनासाठी ठेवले आहेत. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये छोटे-मोठे शिलालेख प्राचीन वस्तूंचा संग्रह तसेच पूर्ण जगातील प्राचीन संस्कृतीतील महत्त्वाचे घटक या प्रदर्शनांमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यासोबतच या दालनामध्ये भारत, इजिप्त, मेसोपोटेमिया, ग्रीस, रोम, पारस, चीन आणि अखंड भारतातील सुमारे ३०० प्राचीन वस्तू प्रेक्षकांसाठी ठेवल्या आहेत.
चीनसह, इजिप्त, रोमन भारतातील व्यापार
चीन येथील वेगवेगळ्या प्राचीन कलाकृतींचादेखील इथल्या प्रदर्शनामध्ये भरणा आहे. प्राचीन काळामध्ये तेथील दागिने, प्राण्यांच्या प्रतिकृती, व्यक्तींचे छोटे छोटे पुतळे, याचबरोबर नाणी त्या वेळेची शेती पद्धती यांची माहितीदेखील शिल्पांद्वारे दिली आहे. रोमन काळामधील त्यांच्या राजांनी जनतेला दिलेल्या संदेशाचा छोटा शिलालेख, विविध प्रकारचे दागिने, वेगवेगळ्या प्रकारची सोने-चांदीची, मातीची भांडी तसेच त्यांची मृत्यूनंतर मृतदेहांना दफन करण्याची पद्धत, याबाबत शिल्पाद्वारे माहिती इथे देण्यात आली आहे. पाड्य, सातवाहन, ऑगस्टस आणि त्याचा उत्तराधीकारी टायबेरीयस यांच्या काळात रोम आणि भारतामधला व्यापार भरभराटीला आल्याची माहिती नाणी, वस्तूंमार्फत देण्यात आली आहे. अरेबियाचे वाळवंट ते रोमन साम्राज्यापर्यंत जाणारा धूप आणि रेशीम मार्गाचा इतिहासही या दालनात उलगडण्यात आला आहे.
आपल्या पूर्वजांचा इतिहास समजून घेण्यासाठी जागतिक दृष्टिकोन आवश्यक असून सिंधू-सरस्वती (हडप्पा) संस्कृतीपासून सुरू होणाऱ्या या प्राचीन वारशाद्वारे भारतभरातील विद्यापीठे आणि शाळांना वस्तूंमधून इतिहास शिकवण्यास प्रोत्साहन देण्याचा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.
- सब्यसाची मुखर्जी, महासंचालक, सीएसएमव्हीएस

