तबला सम्राट उस्ताद झाकिर हुसेन यांना श्रद्धांजली
तबलासम्राट उस्ताद झाकिर हुसेन यांना श्रद्धांजली
‘एनसीपीए’त दोनदिवसीय संगीत मैफल; दिग्गज कलाकारांचे सादरीकरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ ः नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए)तर्फे तबलावादक, संगीतकार आणि भारतीय संगीताची जागतिक ओळख निर्माण करणारे उस्ताद झाकिर हुसेन यांच्या पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त ‘मेस्ट्रो फॉरएव्हर- ए ट्रिब्यूट टू झाकिर हुसेन’ ही दोनदिवसीय विशेष श्रद्धांजलीपर संगीत मैफल आयोजित करण्यात आली आहे. ही मैफल १४ व १५ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत ‘एनसीपीए’मध्ये होणार आहे.
तबलावादनातील अढळ स्थान असलेले उस्ताद झाकिर हुसेन यांचे १५ डिसेंबर २०२४ रोजी निधन झाले. हुसेन यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात भारतासह जगभरातील ५० हून अधिक नामवंत कलाकार सहभागी होणार आहेत. यामध्ये जॉन मॅक्लॉफ्लिन, लुईस बँक्स, डेव्ह लँड, गणेश राजगोपालन, रणजित बारोट, व्ही. सेल्वगणेश, शंकर महादेवन, क्रिस पॉटर, संजय दिवेचा, गिनो बँक्स, पं. अजय चक्रवर्ती, उस्ताद अमजद अली खान, राकेश चौरासिया यांच्यासह अनेक दिग्गज संगीतकारांचा समावेश आहे. ‘मेस्ट्रो फॉरएव्हर’ या उपक्रमांतर्गत हुसेन यांच्या जीवनप्रवासावर आधारित छायाचित्र प्रदर्शन, तसेच निवडक माहितीपटांचे विशेष प्रक्षेपणही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास झाकिर हुसेन यांच्या पत्नी अँटोनिया, मुली अनीसा व इसाबेला तसेच कुटुंबीय उपस्थित राहून या महान कलाकाराच्या स्मृतींना अभिवादन करणार आहेत. मुंबईच्या या सुपुत्राची स्मृती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी महानगरपालिका एनसीपीएला या श्रद्धांजलीपर संगीत मैफलीसाठी सहकार्य करीत असल्याचे महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले.
तीन प्रमुख ठिकाणी थेट प्रक्षेपण
‘एनसीपीए’मधील संगीत महोत्सवाचे थेट प्रक्षेपण महापालिकेच्या सहकार्याने शहरातील तीन प्रमुख ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक मुंबईकरांना या अभूतपूर्व कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे. बोरिवली (प.) येथील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाट्यगृह, दादर पश्चिम येथील महात्मा गांधी स्मारक ऑलिंपिक जलतरण तलाव तसेच भायखळा (पू.) येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृह येथे १४ व १५ डिसेंबरला सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत थेट प्रक्षेपण पाहता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

