अवकाश संशोधनात मुंबई विद्यापीठाचा ठसा
अवकाश संशोधनात
मुंबई विद्यापीठाचा ठसा
तीव्र सौरवादळाच्या रहस्याचा उलगडा करण्यात हातभार
मुंबई, ता. १४ ः पृथ्वीवर मे २०२४मध्ये आलेल्या ‘गॅनन्स सुपरस्टॉर्म’ या दोन दशकांतील सर्वात शक्तिशाली सौरवादळामागील वैज्ञानिक कारणांचा भारतातील संशोधकांनी खुलासा केला आहे. या संशोधनात मुंबई विद्यापीठाचे संशोधकही सहभागी असल्याने विद्यापीठाने जागतिक अवकाश संशोधनात आपला ठसा उमटविला आहे.
‘द अॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार मे २०२४मध्ये सूर्यावरून सलग अनेक मोठे सौर उद्रेक झाले. या उद्रेकांमुळे अवकाशात पृथ्वीच्या आकाराच्या सुमारे १०० पट म्हणजे तब्बल १.३ दशलक्ष किमीचा प्रचंड चुंबकीय पुनर्संयोजन प्रदेश निर्माण झाला. याच प्रक्रियेमुळे सौरवादळ अधिक तीव्रतेने पृथ्वीवर पोहोचले. त्याचा उपग्रह संचलन, संप्रेषण व्यवस्था आणि पृथ्वीच्या चुंबकीय संरक्षण कवचावर मोठा परिणाम झाला.
हा शोध भारताच्या ‘आदित्य-एल१’ मोहीम, तसेच ‘नासा’च्या सहा अंतराळयानांनी मिळून गोळा केलेल्या डेटा व निरीक्षणांवर आधारित आहे. संशोधनाचे नेतृत्व ‘इस्रो’च्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्रातील डॉ. अंकुश भास्कर आणि त्यांचे विद्यार्थी शिबितोष बिस्वास यांनी केले. या कार्यात मुंबई विद्यापीठाचे प्रा. अनिल राघव यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. त्यांच्या सहकार्याने पीएचडी विद्यार्थी अजय कुमार व कल्पेश घाग यांनी विश्लेषण व डेटा अभ्यासात योगदान दिले.
मुंबई विद्यापीठाने या संशोधनाला अभिमानाचा क्षण म्हटले असून पुढील काळात वैज्ञानिक सहकार्य वाढवण्याचा मानस व्यक्त केला आहे. अवकाश विज्ञान क्षेत्रात भारतीय संशोधनाची उंच भरारी दर्शवणारा हा शोध देशासाठी आणि मुंबई विद्यापीठासाठी मैलाचा दगड ठरला असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

