पैशांचा पाऊस, गुप्तधनाची मात्रा लागूच

पैशांचा पाऊस, गुप्तधनाची मात्रा लागूच

Published on

पैशांचा पाऊस, गुप्तधनाची मात्रा लागूच
व्यावसायिकाला २५ लाखांना फसणारी टोळी अटकेत
मुंबई, ता. १५ ः समाजमाध्यमांमुळे आपल्या भोवतीच नव्हेतर जगाच्या कानाकोपऱ्यात काय घडते ते आयते कळते. तरीही पैशांचा पाऊस, गुप्तधनाची भूल मुंबईसारख्या महानगरात विशेषतः पै पैचा हिशोब ठेवणाऱ्या आणि सावधगिरीने गुंतवणाऱ्या व्यापाऱ्यांवर अचूक लागू पडते.
मालाड येथे राहणारे व्यावसायिक दिनेश मेहता अशाच एका प्रलोभनाला बळी पडले आणि २५ लाख रोख भामट्यांना देऊन बसले. झाले असे, बाबुलाल वाघेला या भामट्याने मेहता यांना आधीच हेरून ठेवले होते. त्याने मेहतांसोबत ओळख वाढवली. अचानक एके दिवशी त्याने नाशिक येथील एका मंदिरामागे खोदकाम करताना गुप्तधन हाती लागल्याचे मेहता यांना सांगितले.
९०० ग्रॅम अस्सल सोने आहे, एक कोटींहून अधिक किंमत असेल, ते २५ लाखांत देऊ, असे प्रलोभन बाबुलालने दाखवले. मनोमनी आकडेमोड करून मेहतांना बसल्या जागी ७०, ७५ लाखांचा फायदा दिसू लागला.
खातरजमेसाठी बाबुलालने त्या गुप्तधनातील काही मणी मेहतांच्या हाती ठेवले. ते अस्सल निघाले. त्यामुळे मेहतांच्या उत्साहाला पारावार नव्हता. त्यांनी लगोलग २५ लाखांची जमवाजमव करून ते बाबुलालच्या हाती दिले. बदल्यात बाबुलालने ९०० ग्रॅम वजनाचे दागिने पुढे केले.
मेहता यांनी हे दागिने तपासणीसाठी सराफा बाजारात दिले. तेव्हा ते नकली असून, त्यास सोनेरी वर्ख चढवल्याचे आढळले. भानावर आलेल्या मेहतांनी तातडीने मालाड पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी तीन दिवस अथक परिश्रम घेत बाबुलालसह एकूण चार जणांच्या टोळीला बेड्या ठोकल्या. या टोळीत एका महिलेचाही सहभाग निष्पन्न झाला. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

असा लागला सुगावा
आरोपी बाबुलालचा मोबाईल क्रमांक आणि सीसीटीव्ही फुटेजच्‍या आधारे मालाड पोलिसांनी तपासचक्र सुरू केले. अस्पष्ट चित्रणामुळे बाबुलालचा चेहरा तपास पथकाकडे नव्हता, मात्र मिळतीजुळती देहबोली, चालीची ढब तपासली जात होती. अखेर तांत्रिक तपासाआधारे बाबुलाल आणि त्याच्या सतत संपर्कात असलेल्या चौघांचे मोबाईल क्रमांक पथकाच्या हाती लागले. बाबुलालसह दोघांना गुजरातच्या गांधीनगर येथून, तर अन्य दोघांना विरार येथून पथकाने बेड्या ठोकल्या. बाबुलालच्या राहत्या घराची झाडाझडती घेतली तेव्हा पोलिसांच्या हाती १५ लाखांहून अधिक रोख रक्कम आढळली. ती आणि अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यात सहभागी आणखी एका आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com