वैभवविरोधात आणखी एक गुन्हा नोंद
सकाळ फॉलोअप
---
वैभवविरोधात आणखी एक गुन्हा नोंद
मुख्यमंत्र्यांचा पीए असल्याचे सांगत व्यापाऱ्याला ७४ लाखांना फसविले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ ः ठग वैभव ठाकरविरोधात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा रविवारी (ता. १४) सांताक्रूझ पोलिस ठाण्यात नोंद झाला. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्वीय सहाय्यक, तर पत्नी प्रियांका आयपीएस अधिकारी असल्याचे भासवत वैभवने अल्पेश पटेल (वय ३७) या व्यावसायिकास तब्बल ७४ लाख रुपयांना फसवल्याचा आरोप असल्याचे सांताक्रूझ पोलिसांनी स्पष्ट केले.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार पटेल यांचे जनरल स्टोअरचे दुकान असून, एका नातेवाइकाने वैभवचा त्यांच्यासोबत परिचय करून दिला. वैभवने मुख्यमंत्र्यांचा स्वीय सहाय्यक असल्याची ओळख सांगितली. तसेच ओळखपत्रही दाखवले. आपली पत्नी प्रियांका आयपीएस अधिकारी असून सध्या मुंबईत उपायुक्त म्हणून कार्यरत असल्याचा दावाही वैभवने केला. पटेल यांनी दिंडोशी न्यायालयात दाखल केलेल्या चार दिवाणी दाव्यांचा निकाल त्यांच्या बाजूने लावून देईन, असे प्रलोभन वैभवने दाखवले; मात्र त्यासाठी पैसे लागतील, असे सांगत फेब्रुवारी ते ऑक्टोबरदरम्यान पटेल यांच्याकडून ७४ लाख उकळले.
दरम्यान, ७४ लाख उकळल्यावर वैभवने आणखी ७६ लाखांची मागणी केली. ते शक्य नसल्याचे सांगताच वैभवने पटेल यांना दिवाणी दाव्यांचा निकाल विरोधात लागेल, अशी धमकी दिली.
--
पत्र पाठवून कामाची हमी
आपले काम होईल, निश्चिंत राहा, असा निरोप देणारे पत्र वैभवने २२ मे रोजी पटेल यांना स्पीड पोस्टद्वारे पाठवले. या पत्रात ग्लोबल कनेक्ट ही कंपनी आपली असून त्यात पटेल यांनी आतापर्यंत ३० लाख रुपये जमा केल्याचा उल्लेख केला आहे. या पत्राची प्रत ‘सकाळ’च्या हाती लागली आहे.
---
बँक खात्याचा समान धागा
पटेल यांनी वैभवच्या सूचनेवरून ग्लोबल कनेक्ट कन्सल्टन्सी कंपनीच्या खात्यावर ६५ लाख, तर नऊ लाख रुपये रोख स्वरूपात दिले. वैभव व पत्नी प्रियांका यांच्याविरोधात एलटी मार्ग पोलिस ठाण्यात दाखल फसवणुकीच्या अन्य गुन्ह्याचा तपास या खात्यांच्या केंद्रस्थानी आहे. त्या प्रकरणातील तक्रारदाराने याच खात्यावर १.१५ कोटी रुपये भरले होते.
---
वैभवची पार्श्वभूमी
सराफा व्यावसायिक शैलेश जैन यांची २.८० कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपात एल. टी. मार्ग पोलिसांनी वैभवला अटक केली, तर पत्नी प्रियांका अटकपूर्व जामिनावर आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) गुन्ह्यातून जामिनावर सुटताच वैभवने गोवा सरकारला ३१ लॅपटॉप दिले; मात्र ‘सकाळ’ने त्याचा खरा चेहरा समोर आणताच गोवा सरकारने हे लॅपटॉप परत करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय मेळघाटचे भाजप आमदार केवलराम काळे, विधिमंडळ सचिवालयाच्या अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून अधिवेशनाचा बोगस पास तयार केला होता.
कोट
वैभव कायम पिवळा दिवा असलेल्या आलिशान कारमधून येत असे. सोबत दोन-तीन शस्त्रधारी, वॉकीटॉकी असलेले अंगरक्षक होते. त्याने आपले ओळखपत्रही दाखवले होते. त्याचा रुबाब, देहबोली पाहून खरेच तो मुख्यमंत्र्यांचा पीए असावा, असे वाटले.
- अल्पेश पटेल, तक्रारदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

