आंतरराष्ट्रीय तस्करांपर्यंत धागेदोरे?

आंतरराष्ट्रीय तस्करांपर्यंत धागेदोरे?

Published on

आंतरराष्ट्रीय तस्करांपर्यंत धागेदोरे?
सातारा प्रकरणातील आरोपींकडे चौकशी सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ ः सांगलीप्रमाणे सातारा येथील अमली पदार्थ कारखाना उभारणीतही आंतरराष्ट्रीय तस्करांचा सहभाग आहे का, याबाबत गुन्हे शाखेकडून अटक आरोपींकडे कसून चौकशी सुरू आहे.
गेल्यावर्षी गुन्हे शाखेच्या याच पथकाने सांगली येथील एमडीचा कारखाना उद्ध्वस्त केला होता. त्या कारवाईत सुमारे ३०० कोटींचा अमली पदार्थ आणि अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. कारखान्यात सापडलेल्या व्यक्तींशिवाय मुंबई, गुजरातमधूनही इतर आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींच्या चौकशीत हा कारखाना दुबई येथील आंतरराष्ट्रीय तस्कर सलीम डोला आणि त्याच्या साथीदारांच्या सूचनेवरून आणि अर्थसाह्याआधारे उभा राहिल्याचे पुढे आले होते. गुन्हे शाखेने अथक प्रयत्न करून संयुक्त अरब अमिरातीहून डोलाचा मुलगा आणि अन्य दोघांचे प्रत्यार्पण करून घेतले होते.
या पार्श्वभूमीवर सातारा प्रकरणातील आरोपी डोला किंवा अन्य तस्करांच्या संपर्कात होते का, त्यांचा या कारखान्यात सहभाग होता का, अर्थसाह्य पुरवणारे नेमके कोण आहेत, रसायनांची जमवाजमव कशी केली, याबाबत गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. त्यासाठी पोलिसांनी अटक आरोपींच्या मोबाईलची तपासणी सुरू केली आहे. मागील आठवड्यात जावळी तालुक्यातील सावरी गावातील एका शेतात सुरू असलेला एमडी पदार्थाचा कारखाना गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने उद्ध्वस्त केला. याप्रकरणी विशाल मोरे या आरोपीसह एकूण सात जणांना अटक करण्यात आली.
----
शेतातील जागेच्या वापराबाबत अनभिज्ञ!
विशालकडे तयार झालेल्या अमली पदार्थाच्या विक्रीची जबाबदारी होती. ओमकार दिघे या स्थानिक तरुणाच्या मध्यस्थीने जमीन मालकाने तोंडी व्यवहार करून ही जागा आरोपींना भाड्याने दिली होती. गुन्हे शाखेच्या चौकशीत ओमकार आणि विशाल एकमेकांना ओळखत होते, अशी माहिती पुढे आली आहे; मात्र शेतातील या जागेचा वापर नेमका कशासाठी सुरू होता, हे आपल्याला माहीत नाही, या जबाबावर ओमकार ठाम आहे. तो सावरी गावातील पावशेवाडीचा रहिवासी असून, या भागात कोयना पाणलोट क्षेत्र पर्यटनस्थळ आहे. पर्यटनाच्या निमित्ताने आलेल्या विशालसोबत ओळख झाली होती, असे त्याने गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना सांगितल्याचे समजते.

Marathi News Esakal
www.esakal.com