मुंबई महापालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवारांची भिस्त आमदार-खासदारांच्या कामावर
इच्छुक उमेदवारांची भिस्त आमदार-खासदारांच्या कामावर
तीन वर्षांपासून प्रशासकाच्या हातात कारभार; ना निधी, ना विकासकामे, मतदारांसमोर जाताना कामांची पाटी कोरीच
बापू सुळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ ः मुंबई महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम जाहीर झाला असून आता इच्छुक उमेदवारांकडून तिकीट मिळवण्यासाठी, मतदारांची जुळवाजुळव करण्यासाठी जोरबैठका सुरू झाल्या असल्या तरी प्रत्यक्ष निवडणूक प्रचारात त्यांची मोठी दमछाक होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून अधिकृत नगरसेवकच अस्तिवात नसल्याने सर्व कारभार प्रशासक म्हणून आयुक्तच हाकत होते. त्यामुळे प्रभागात नगरसेवक म्हणून कोणतीच कामे करता आली नाहीत. त्यामुळे आता मतदारांपुढे जाताना त्यांची पक्षाच्या आमदार-खासदारांनी केलेल्या विकासकामांवरच भिस्त असणार आहे.
मुंबई महापालिकेचे शहर आणि उपनगरात २२७ प्रभाग असून त्याचा प्रतिनिधी म्हणून नगरसेवक काम करतात. त्यानुसार ते रस्ते, गटार व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता, चाळीमध्ये लादीकरण, पेव्हर ब्लॉक बसवणे, सुशोभीकरण अशी विविध कामे करण्यासाठी वर्षाला त्यांना तीन-पाच कोटी रुपये एवढा निधी मिळतो; मात्र २०२२ नंतर नगरसेवकांचा कार्यकाल संपल्याने गेल्या तीन वर्षांत त्यांना कोणताही निधी न मिळाल्याने प्रभागात कामे करता आलेली नाहीत. त्यामुळे त्यांना आता निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या माजी नगरसेवकांना आणि इच्छुक उमेदवारांची विकासकामाच्या बाबतीत पाटी कोरी असणार आहे. परिणामी, त्यांना आपल्या राजकीय पक्षाच्या आमदार- खासदारांनी गेल्या पाच वर्षांत काय कामे केली, याचाच आधार घ्यावा लागेल, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
मतदार स्वीकारणार का?
मतदारांसाठी आमदार, खासदारांच्या तुलनेत नगरसेवक जवळचा असतो, त्याच्याशी दैनंदिन समस्यांबाबत सहज चर्चा करता येते; पण तीन वर्षांपासून कार्यकाल संपल्याने आणि निधी नसल्याने अनेक जण कार्यरत नव्हते. नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आता तीन वर्षांनंतर मतदारांपुढे जाणाऱ्या माजी नगरसेवक आणि विद्यमान उमेदवार असलेल्यांना स्वीकारणार का, हा प्रश्न आहे. दरम्यान, जे उमेदवार नवखे आहेत, त्यांची राजकीय इनिंग सुरू होणार असल्याने त्यांच्यासाठी ही बाब फायदेशीर ठरू शकेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
मुंबईच्या गल्लीबोळात काम करणारा माणूस म्हणून नगरसेवकांकडे पाहिले जाते; मात्र गेल्या तीन वर्षांत त्यांचा कार्यकाल संपलेला असल्याने आणि सर्व कारभार प्रशासकाच्या हाती होता. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना आता आपल्या पक्षाच्या आमदार, खासदारांनी केलेली कामे मतदारांपुढे घेऊन जावे लागणार आहे. त्यांच्याकडे स्वत:च्या कामाचे प्रगतिपुस्तक नसेल, त्यामुळे मतदारांना आपलेसे करताना त्यांची दमछाक होईल.
- जयंत माईनकर, राजकीय विश्लेषक
तीन वर्षांपासून सर्वच आज नगरसेवक माजी झाले आहेत. तसेच निधी नसल्याने तीन वर्षांत त्यांना कोणतीही कामे करता आली नाहीत. त्यामुळे त्यांना आता आमदार, खासदारांनी केलेल्या विकासकामांच्या कुबड्या घेऊन मतदारांपुढे जावे लागेल.
- अनिल गलगली, सामाजिक कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

