दोन्ही ठाकरेंचे चाललंय काय?

दोन्ही ठाकरेंचे चाललंय काय?

Published on

दोन्ही ठाकरेंचे चाललंय काय?
मुंबई पालिकेसाठी बंधूंच्या युतीवर राजकीय वर्तुळाचे लक्ष
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : महापालिका निवडणुकांची अधिकृत घोषणा होताच मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. तब्बल दोन दशकांहून अधिक काळ मुंबईवर वर्चस्व गाजवणाऱ्या शिवसेनेचा गड ढासळल्यानंतर या निवडणुका केवळ महापालिकेपुरत्या न राहता मराठी नेतृत्व, ठाकरे ब्रँड आणि मुंबईच्या सत्तेचा फैसला करणाऱ्या ठरणार आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही भाऊ अनेकदा एकत्र दिसत असले तरी त्यांच्या युतीबाबत मात्र अद्याप संभ्रमावस्था कायम आहे.

अधिकृत घोषणा अद्याप नाही
महापालिका निवडणुकीच्या घोषणेनंतर शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. थेट भेटीगाठी नसल्या तरी दोन्ही बाजूंकडून येणाऱ्या सूचक वक्तव्यांमुळे ठाकरे बंधूंची युती पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. काही दिवसांपूर्वी सार्वजनिक कार्यक्रमांमधील सौहार्दपूर्ण उल्लेख, तसेच नेत्यांच्या पातळीवरील ‘सकारात्मक संकेत’ यामुळे राजकीय चर्चांना बळ मिळाले आहे, मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

युती होणे का गरजेचे?
राजकीय विश्लेषकांच्या मते, सध्याच्या परिस्थितीत ठाकरे बंधूंची युती ही त्यांच्यासाठी केवळ पर्याय नाही, तर गरज बनली आहे. एकीकडे भाजप-शिंदे गटाची महायुती पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे, तर दुसरीकडे शिवसेना (ठाकरे) आणि मनसे स्वतंत्र लढल्यास मराठी मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन होण्याची शक्यता आहे. मुंबईत प्रभागनिहाय लढतींमध्ये ही मतविभागणी निर्णायक ठरू शकते.

मराठीचा मुद्दा
ठाकरेंच्या शिवसेनेकडे अजूनही पारंपरिक शिवसैनिकांची फळी आहे, तर मनसेकडे शहरी मराठी मध्यमवर्गात प्रभाव आहे. हे दोन्ही प्रवाह एकत्र आल्यास महायुतीसमोर तगडी राजकीय आघाडी उभी राहू शकते, असा दावा केला जात आहे. त्यांच्याकडून मराठीचा मुद्दा तापवण्यास सुरुवात झाली आहे. त्‍यामुळे यंदाची निवडणूक ही मराठी माणसाच्या मुद्द्यांच्या केंद्रस्थानी असेल हे निश्चित.

युती न झाल्यास काय नुकसान?
ठाकरे बंधू वेगवेगळे लढल्‍यास त्याचा थेट फायदा सत्ताधारी महायुतीला होण्याची शक्यता आहे. अनेक प्रभागांमध्ये शिवसेना (ठाकरे) आणि मनसेची मते मिळून विजय शक्य असतो; मात्र स्वतंत्र उमेदवार दिल्यास मतफुटीमुळे पराभव ओढवू शकतो. त्‍यामुळे मुंबईतील मराठी नेतृत्व अधिक कमकुवत होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे, शिवाय ‘एकत्र येऊ शकले नाहीत’ हा संदेश मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करू शकतो.

युती झाल्यास काय फायदा?
ठाकरे बंधूंची युती झाली, तर ती केवळ निवडणुकीपुरती मर्यादित न राहता राजकीय भावनिक पुनर्मिलन ठरू शकते. ‘मराठी अस्मिता’ आणि ‘मुंबईवर मराठी नेतृत्व’ हा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी येऊ शकतो. संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि प्रचारातील धार यामुळे महायुतीला कडवी झुंज देणे शक्य होईल. विशेषतः तरुण मराठी मतदार आणि नाराज शहरी वर्ग पुन्हा आकर्षित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अनेक अडथळ्यांची शर्यत
युतीच्या मार्गात अडथळेही आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका, जागावाटपाचे गणित आणि वैचारिक मतभेद हे मुद्दे अजूनही प्रलंबित आहेत. त्यामुळे युतीचा निर्णय केवळ भावनिक न राहता राजकीय तडजोडीवर अवलंबून राहणार आहे.

ठाकरे नेतृत्वाच्या भवितव्याची चाचणी
महापालिका निवडणूक ही केवळ महापालिकेची निवडणूक नसून, ठाकरे नेतृत्वाच्या भवितव्याची चाचणी मानली जात आहे. ठाकरे बंधू एकत्र येतात की स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतात, यावर मुंबईच्या सत्तेचे गणित ठरणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या युतीबाबत होणाऱ्या हालचालींवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष केंद्रित झाले आहे.

बालेकिल्ल्यांत तडजोड नाही!
ठाकरे गट-मनसे युतीच्या चर्चा वेग घेत असताना जागावाटपाचा मुद्दा कळीचा ठरतो आहे. शिवतीर्थावरील भेटीनंतर युतीची शक्यता वाढली असली तरी मनसेने आपल्या अटी स्पष्ट केल्या आहेत. जास्त जागा नकोत, पण आमच्या प्रभावाच्या जागांवर तडजोड होणार नाही, असा ठाम सूर मनसेकडून लावण्यात आला आहे. पक्षाने ४० ते ५० निर्णायक जागांवर दावा केला असून, लालबाग, दादर, माहीम, परळसह बालेकिल्ल्यांवर हक्क सांगितला आहे. अंतिम निर्णय राज ठाकरेच घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दोन्ही ठाकरे बंधू युतीच्या बाजूने असून, तसे संकेत काही दिवसांपासून मिळत आहेत. काही दिवसांनी होणाऱ्या संयुक्त सभेत ते याबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे. युती करणे दोघांसाठी अपरिहार्य आहे. काँग्रेसबाबत अद्याप काही स्पष्ट नसले तरी एकमेकांवरील टीका टिप्पणी त्यांनी बंद केल्याचे दिसते. त्यामुळे त्याबाबतही सकारात्मक आहेत, असे दिसते.
- हेमंत देसाई, ज्येष्ठ पत्रकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com