आयआयटीतील भोजनगृहास माजी विद्यार्थ्यांचे नाव
आयआयटीतील भोजनगृहास माजी विद्यार्थ्याचे नाव
मुंबई, ता. १६ ः आयआयटी मुंबईतील वसतिगृह क्रमांक चारमध्ये असलेल्या भोजनगृहाला माजी विद्यार्थी डॉ. प्रमोद चौधरी यांचे नाव देण्यात आले आहे. वसतिगृहातील एका भोजनगृहाला अशा प्रकारे पहिल्यांदाच नाव देण्यात आले आहे.
प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष असलेले डॉ. चौधरी अनेक वर्षांपासून संस्थेच्या शैक्षणिक आणि वसतिगृहाच्या विकासासाठी योगदान देत आहेत. त्यांच्या या योगदानाची दखल आयआयटीने घेतली आहे. डॉ. चौधरी यांच्या मदतीमुळे वसतिगृह क्रमांक चारमध्ये ८०० जण बसू शकतील, असे आधुनिक सोयींनी सुसज्ज असे नवे भोजनगृह उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पदवी शिक्षण घेत असताना डॉ. चौधरी याच वसतिगृहात राहत होते. हे भोजनगृह आता कॅम्पसमधील सर्वांत मोठे भोजनगृह ठरले आहे. या वेळी डॉ. चौधरी म्हणाले, माझ्या मातृसंस्थेने दिलेल्या या सन्मानामुळे मी खूप भावुक झालो आहे. आयआयटीचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी डॉ. चौधरी यांच्या उदारतेबद्दल आणि संस्थेशी असलेल्या त्यांच्या दीर्घकालीन नात्याबद्दल आभार व्यक्त केले.

