दंड टाळण्‍यासाठी अवजड वाहतुकदारांची शक्कल

दंड टाळण्‍यासाठी अवजड वाहतुकदारांची शक्कल

Published on

दंड टाळण्‍यासाठी अवजड वाहतूकदारांची शक्कल
नंबर प्लेटवर ग्रीस, सिमेंट; प्रवेशबंदीचे उल्लंघन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबईतील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर बनत असून, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांवर निर्बंध घातले आहेत; मात्र हे नियम धाब्यावर बसवून अनेक वाहतूकदार फसवणुकीसाठी वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्यातच आता वाहनांच्या नंबर प्लेटवर ग्रीस, सिमेंट लावून ती ओळखता येऊ नये, अशी शक्कल वाहनचालकांकडून लढवली जात आहे.

मुंबईत दररोज सुमारे पाच हजार अवजड वाहने ट्रक, टिप्पर आणि ट्रॉली हे मालवाहतुकीसाठी फिरतात. मोठ्या प्रमाणावर ही वाहने भारक्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे रस्त्यांचे नुकसान होण्याबरोबरच अपघातांचाही धोका वाढला आहे. शहरातील वाढत्या मेट्रो आणि पायाभूत विकासकामांमुळे रस्ते खोदले गेले असून, अनेक ठिकाणी वाहतुकीच्या मार्गिका कमी झाल्या आहेत. अशावेळी बंदी असूनही अवजड वाहने गर्दीच्या वेळेत शहरात प्रवेश करतात. वाहतूक विभागाच्या नियमांनुसार दक्षिण मुंबईत सकाळी ७ ते रात्री १२ पर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदी आहे, तर इतर भागांत: सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५ ते १० या वेळेत बंदी लागू आहे. त्यातच रात्रीच्या सुमारास वाहतूक पोलिसांची वर्दळ कमी होताच अनेक अवजड वाहनचालक ओव्हरलोड आणि ओव्हरस्पीड करत नियमांना बगल देतात. दुसरीकडे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी वायुवेग पथकाला वेळोवेळी सूचना देण्यात येतात, असे परिवहन विभागाने सांगितले आहे.

..
कारवाई सुरू
ट्रॉम्बे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमेश्वर खाटपे यांनी सांगितले की, पूर्व मुक्त मार्गांवर ज्या अवजड वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहे, त्यांच्यावर कारवाई सुरू आहे.

..
पूर्व मुक्त मार्गावर वडाळा येथील शांतीनगर, रे रोड भागातून आदी भागात अवजड वाहतूक सुरू आहे. या वाहनांमध्ये भारक्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होत आहे. त्यामुळे रस्त्याचे नुकसान आणि अपघात होण्याचा धोका आहे, मात्र त्याकडे वाहतूक पोलिस दुर्लक्ष करत आहेत.
- प्रदीप वाघमारे, अवजड वाहतूक विभागप्रमुख, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना

Marathi News Esakal
www.esakal.com