प्रश्नमंजुषा स्पर्धेचा निकाल जाहीर
प्रश्नमंजुषा स्पर्धेचा निकाल जाहीर
मुंबई. ता. १६ ः यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विकास मंचच्या वतीने सोळाव्या राज्यस्तरीय वार्षिक शिक्षण परिषदेच्या पूर्वतयारीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शिक्षक प्रश्नमंजुषेचा आज निकाल जाहीर झाला. या स्पर्धेला राज्यातून ६,००५ शिक्षक-सदस्यांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा मराठी आणि इंग्रजी या दोन माध्यमांतून घेण्यात आली होती.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०च्या संदर्भाने ‘मूल्यांकनाच्या नव्या दिशा’ या मध्यवर्ती विषयावर ही स्पर्धा ऑनलाइन स्वरूपात घेण्यात आली होती. शिक्षक प्रश्नमंजुषा उपक्रमाचे प्रमुख म्हणून शिक्षण विकास मंचचे मुख्य संयोजक डॉ. काळपांडे यांनी जबाबदारी पार पाडली. कोल्हापूर येथील सहाय्यक प्राध्यापिका सोनाली सुनील सदरे, वेंगुर्ला तालुक्यातील सहाय्यक शिक्षक प्रशांत भालचंद्र चिपकर, कोपरगाव येथील सहाय्यक शिक्षक नितीन बारगळ या तीन विजेत्यांना प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन रविवार ४ जानेवारी २०२६ रोजी मुंबई येथे होणाऱ्या सोळाव्या राज्यस्तरीय वार्षिक शिक्षण परिषदेत मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे.

