महापालिका निवडणुकीत आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर

महापालिका निवडणुकीत आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर

Published on

आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर
महापालिका निवडणुकीबाबत काँग्रेसचे स्पष्टीकरण
मुंबई, ता. १६ ः आगामी महापालिका निवडणुकीत आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक नेतृत्वाला देण्यात आले आहेत. ज्या समविचारी पक्षांचे आघाडीसाठी प्रस्ताव येतील, त्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी टिळक भवन येथे बैठक पार पडली. या वेळी ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांच्या रणनीतीवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेसंदर्भात स्वतंत्र चर्चा करण्यात येईल. इच्छुक उमेदवारांच्या जिल्हा पातळीवर बुधवारपासून मुलाखती होतील. त्यानंतर २५ आणि २६ डिसेंबर रोजी राज्य पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत उमेदवार निश्चित केले जातील, अशी माहितीही प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी दिली.
--
भाजपने माफी मागावी!
नॅशनल हेराल्डप्रकरणी न्यायालयाने दिलेला निर्णय भाजपच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडणारा आहे. त्यामुळे भाजपने सोनिया आणि राहुल गांधी यांची बदनामी केल्याप्रकरणी जाहीर माफी मागावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली.
--
कोकाटेंची हकालपट्टी करा!
सदनिका घोटाळ्याप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयानेही कायम ठेवली आहे. राहुल गांधी, सुनील केदार यांना शिक्षा होताच २४ तासांत त्यांची खासदारकी, आमदारकी रद्द केली होती. त्यामुळे सरकारने तत्काळ माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली.
---
मुंबईच्या प्रश्नावर लढणार ः गायकवाड
मुंबई : महापालिकेत भाजप महायुतीने प्रशासकाच्या माध्यमातून मुंबईकरांच्या पैशांवर दरोडा टाकला आहे. कंत्राटदार, उद्योगपतींना मुंबई विकली जात आहे. मुंबईच्या विकासासाठी आणि मुंबईकरांच्या प्रश्नावर काँग्रेस पक्ष ताकदीने निवडणूक लढवून विजयी पताका फडकवेल, असा निर्धार मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com