‘शिवतीर्थ’वर हालचाली सुरू
‘शिवतीर्थ’वर हालचाली सुरू
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचे संकेत ठळक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच राज्याच्या राजकारणात वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ‘शिवतीर्थ’ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आज खासदार संजय राऊत आणि नेते अनिल परब यांनी त्यांची घेतलेली भेट ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचे संकेत ठळक करणारी असल्याचे मानले जात आहे.
मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होताच ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का, हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना (ठाकरे) आणि मनसे युतीच्या चर्चा सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर शिवतीर्थवर तब्बल ४५ मिनिटे चाललेली चर्चा ही अंतिम टप्प्यातील राजकीय खलबते असल्याचे मानले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या भेटीत मुख्यत्वे मुंबई महापालिकेतील जागावाटप, प्रचाराची दिशा, तसेच युतीची घोषणा कोणत्या पद्धतीने करायची यावर सविस्तर चर्चा झाली. युती जाहीर करण्याची वेळ आणि मंच याबाबतही विचारमंथन झाल्याची चर्चा आहे. अनिल परब यांनीही माध्यमांशी बोलताना युतीची अधिकृत घोषणा लवकरच होईल, असे सूचक संकेत दिले.
...
समीकरणांची नांदी
संजय राऊत यांनी ठाकरे बंधू एकत्र आल्यास कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. मुंबईसह काही प्रमुख महापालिकांमध्ये एकत्र लढण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने, ही भेट केवळ चर्चा न राहता, आगामी राजकीय समीकरणांची नांदी ठरत असल्याचे चित्र आहे. पालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत शिवतीर्थवर घडलेली ही भेट राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ठरेल, अशीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

