सत्तासमीकरणात दलित पक्षांची कोंडी!

सत्तासमीकरणात दलित पक्षांची कोंडी!

Published on

सत्तासमीकरणात दलित पक्षांची कोंडी!
‘रिपाइं’सह छोट्या पक्षांचे भवितव्य महायुतीच्या जागावाटपावर अवलंबून
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ ः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, प्रमुख पक्षांच्या बैठका सुरू झाल्या आहेत, मात्र कधीकाळी मुंबईतील अनेक भागांवर प्रभाव असलेल्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासह (आठवले) इतर छोट्या पक्षांची रणनीती अद्याप महायुतीतील जागावाटपावरच अवलंबून आहे.
मुंबईतील अनेक प्रभागांमध्ये दलित मतदारांची संख्या लक्षणीय आहे. मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये दलित समाजाचा मोठा कल काँग्रेस आणि शिवसेनेकडे राहिला, मात्र या वेळी पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार नसल्यामुळे हा मतदार विभागला जाण्याची शक्यता आहे. एकेकाळी मुंबईतील दलित मतदारांवर रामदास आठवले यांच्या ‘रिपाइं’चा प्रभाव होता, मात्र भाजपसोबत युती केल्यानंतर हा प्रभाव सातत्याने कमी होत गेला असल्याचे निवडणूक निकाल स्पष्ट करतात.
कधी-काळी मुंबई पालिकेत ‘रिपाइं’चे १२ नगरसेवक होते, मात्र कालांतराने पक्षाचे अस्तित्त्व क्षीण होत गेले. २०१७ च्या पालिका निवडणुकीत रिपाइं ३० जागा लढवूनही एकही नगरसेवक निवडून आणू शकला नव्हता. तरीही या वेळी कोणत्याही परिस्थितीत पालिकेत पक्षाचे अस्तित्व राखण्याचा निर्धार ‘रिपाइं’ने केला आहे.
या वेळी ‘रिपाइं’ने भाजपकडे २३ जागांची मागणी केली असून, त्यातील किमान १६ जागा सुटतील, अशी पक्षाला अपेक्षा आहे. विक्रोळी, घाटकोपर पूर्वेतील रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर पश्चिमेतील भीमनगर, चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनी, पी. एल. लोखंडे मार्ग, गोवंडीतील लुंबिनी बाग, धारावीतील काही भाग, नेहरूनगर, कोरबा मिठानगर, केतकीपाडा, फिल्टरपाडा तसेच जोगेश्वरीतील काही भागांत पक्षाचा प्रभाव असल्याचा दावा ‘रिपाइं’ने केला आहे. याच भागांतील जागांची मागणी करण्यात आली आहे. जागावाटपाबाबत एक बैठक झाली असून, लवकरच दुसरी बैठक होणार आहे. या वेळी मुंबईत संघटनात्मक तयारी चांगली आहे. दुहेरी आकडा गाठू, असा विश्वास पक्षनेतृत्वाने व्यक्त केला आहे.

किती जागा सुटणार?
महायुतीत दोन दलित पक्ष सहभागी आहेत. आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना व जोगेंद्र कवाडे यांच्या पिपल्स रिपब्लिकन पक्षाची युती शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहे. कवाडे यांच्या पक्षाचा मुंबईत फारसा प्रभाव नाही, मात्र आनंदराज आंबेडकर यांच्या प्रभाव मुंबईतील काही भागांमध्ये आहे. महायुतीत शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपात अनेक अडचणी आहेत. भाजपला दीडशे जागा लढवायच्या आहेत. त्यामुळे शिंदेंच्या वाट्याला जागा कमी येतील.
भाजपला आपल्या कोट्यातून आठवले, तर शिवसेनेला आनंदराज आंंबेडकर यांच्यासाठी तसेच कवाडे यांच्या पक्षासाठी काही जागा सोडाव्या लागणार आहेत. या दोन्ही पक्षांच्या वाट्याला किती जागा येतील, हा प्रश्नच आहे. आठवले यांच्या पक्षासाठी भाजप जागा सोडते, मात्र अनेकदा त्या कागदावर असतात, आमची फसवणूक होते, अशी तक्रार ‘रिपाइं’च्या पदाधिकाऱ्यांची आहे.

दलित पक्षापुढील आव्हान
- मिळालेल्या जागांमध्ये दलितांसह इतर समाजाच्या उमेदवारांना सामावून घेणे
- काँग्रेस, शिवसेनेकडून मतदारांना परत खेचून आणणे
- मुंबई पालिकेत अस्तित्व राखणे

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आम्हाला जागा मिळाल्या नाहीत. आम्ही शांत बसलो, मात्र या वेळी कमी जागा दिल्यास आम्ही तो अपमान सहन करणार नाही, आमचा उद्रेक होईल.
- बाळासाहेब गरुड,
मुंबई कार्याध्यक्ष, रिपाइं (आठवले)

आमची युती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहे. जागावाटपाची चर्चा उद्या होईल. आम्ही या वेळी १० ते १२ जागांची मागणी केली आहे.
- आनंदराज आंबेडकर,
सरसेनापती, रिपब्लिकन सेना

महायुतीकडे आम्ही १० ते १२ जागांची मागणी केली आहे. आम्ही तिन्ही पक्षांकडे आमची यादी सोपवली आहे. जागा न मिळाल्यास स्वबळाचा मार्ग खुला आहे.
- जयदीप कवाडे, अध्यक्ष, पिरीपा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com