रात्र वैऱ्याची, सावध राहा!
रात्र वैऱ्याची, सावध राहा!
उद्धव ठाकरेंचा इच्छुक उमेदवारांशी संवाद; मनसेसाेबत युतीचेही संकेत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (ता. १७) ‘मातोश्री’वर इच्छुक उमेदवारांशी संवाद साधला. ‘रात्र वैऱ्याची आहे, आपण सर्वांनी सजग राहायला हवे,’ अशा शब्दांत सावधानतेचा इशारा देऊन उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. या वेळी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी (मनसे) युती करण्याबाबत कार्यकर्त्यांचा कल जाणून घेत युतीचे संकेतही दिले.
मुंबईतील प्रत्येक वॉर्डमधून आठ ते दहा इच्छुक उमेदवार असल्याने पक्षात मोठी चुरस पाहायला मिळत आहे. आज सकाळपासूनच मातोश्रीबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. उद्धव ठाकरे यांनी गटनिहाय आणि काही ठिकाणी वैयक्तिकरीत्या उमेदवारांशी चर्चा केली. अनेकांनी आपल्या कामाचा लेखाजोखा आणि अहवाल सादर केला. ‘तुमचे अहवाल माझ्याकडे आले आहेत, त्याचे योग्य निरीक्षण करूनच उमेदवारी जाहीर केली जाईल. त्यामुळे निश्चिंत राहा,’ असे आश्वासन ठाकरे यांनी दिले.
मनसेबाबत सकारात्मक कौल
बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या युतीबाबत इच्छुक उमेदवारांशी चर्चा केली. ‘जर मनसेशी युती झाली तर काही जागा त्यांना सोडाव्या लागतील, यासाठी तुमची तयारी आहे का?’ असा प्रश्न त्यांनी विचारला. यावर उपस्थित बहुतांश कार्यकर्त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मुंबईत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपला सडेताेड उत्तर द्या!
भाजपवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, की ‘आजवर अनेक पक्षांनी युती-आघाडी केली. उमेदवार पाडण्याचे राजकारण केले; मात्र भाजप आता पक्षच संपवण्याची भाषा करत आहे. अशी भाषा आजवर कोणत्याही पक्षाने केली नव्हती. या निवडणुकीत आपल्याला भाजपला सडेतोड उत्तर द्यायचे आहे. निकालाची पर्वा न करता कामाला लागा आणि महापालिकेवर भगवा झेंडा फडकवा.’
विकासाच्या मुद्द्यावर भर
‘सध्या मराठी-अमराठी असा वाद लावण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. या माध्यमातून सामाजिक सलाेखा बिघडवण्याचे कारस्थान काही जण करत आहेत. त्या चर्चेत न पडता आपण केलेल्या विकासकामांच्या जोरावर मते मागा,’ असे आवाहन त्यांनी केले. ‘आपण जी कामे केली आहेत ती लोकांपर्यंत पोहोचवा, मतदार निश्चितपणे आपल्या पाठीशी उभे राहतील. फक्त सावध राहून कामाला लागा,’ असे निर्देश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. या बैठकीनंतर कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी दिवसांत उमेदवारीची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
.....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

