माहिमचा शिवसेनेचा किल्ला अजून अभेद्य

माहिमचा शिवसेनेचा किल्ला अजून अभेद्य

Published on

माहीमचा शिवसेनेचा किल्ला अजून अभेद्य
प्रभाग १९१ कडे सगळ्यांचे लक्ष
मिलिंद तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : पालिकेचा प्रभाग क्रमांक १९१ हा शिवसेना ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या विशाखा राऊत यांचा बालेकिल्ला असून, हा मुंबईच्या माहीम परिसरातील राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील प्रभाग मानला जातो. हा प्रभाग जी उत्तर विभागात येतो आणि शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. माहिम दर्गा, मच्छीमार वस्ती, जुने मराठी भाग, चाळी आणि दाट नागरी वस्ती अशी या प्रभागाची रचना आहे. येथे ठाकरेंच्या शिवसेनेची मजबूत पकड असून, तिला सैल करणे विरोधकांसाठी फारच कठीण आहे.
प्रभाग क्रमांक १९१ हा दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघांतर्गत येत असून, ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल देसाई हे येथील खासदार आहेत, तर विधानसभेच्या माहीम मतदारसंघातून ठाकरेंच्याच शिवसेनेचे महेश सावंत हे येथील आमदार आहेत. या प्रभागाची अंदाजे लोकसंख्या ५५ ते ६० हजारांच्या दरम्यान आहे. मतदारसंख्या साधारणपणे ३० ते ३५ हजारांदरम्यान आहे. स्थानिक मतदारांमध्ये पारंपरिक रहिवासी, कामगारवर्ग, मच्छीमार समाज आणि मध्यमवर्गीय नोकरदार यांचे प्रमाण मोठे आहे.
सामाजिक रचनेचा विचार करता या प्रभागात मुस्लिम समाज संख्येने मोठा असून, सुमारे ३५ ते ४० टक्के आहे. यानंतर मराठी समाजाचे प्रमाण ३० ते ३५ टक्के असून, त्यात मराठा, कोळी, आगरी तसेच चाळ संस्कृतीत वाढलेले कुटुंब मोठ्या संख्येने आहेत. बौद्ध समाज सुमारे १० ते १५ टक्के असून, हा घटक संघटित मतदानासाठी ओळखला जातो. उर्वरित भागात उत्तर भारतीय, गुजराती व इतर समाज आहेत.
प्रभाग १९१ मध्ये नागरी प्रश्न कायम ऐरणीवर असतात. पुनर्विकास रखडणे, जुन्या इमारतींची दुरवस्था, अरुंद रस्ते, पावसाळ्यात जलभराव, कचरा व्यवस्थापन, पार्किंगचा प्रश्न आणि भोगवटा प्रमाणपत्रांचा पेच हे येथील प्रमुख मुद्दे आहेत. तसेच माहीम दर्गा परिसरातील वाहतूक कोंडी आणि स्वच्छतेचा प्रश्नही सातत्याने चर्चेत असतो.
राजकीयदृष्ट्या पाहता, हा प्रभाग शिवसेनेचा (ठाकरे) मजबूत प्रभाव असलेला मानला जातो. विशाखा राऊत यांचा स्थानिक संपर्क, पक्षाची जुनी संघटनात्मक ताकद आणि माहीममधील पारंपरिक मतदारांशी असलेले नाते यामुळे हा वॉर्ड कायम चर्चेत राहिला आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम-मराठी मतांचे समीकरण, स्थानिक प्रश्न आणि उमेदवाराचा थेट जनसंपर्क हेच या प्रभागातील निकाल ठरवणारे प्रमुख घटक ठरणार आहेत.

२०१७ मधील निकाल :
विशाखा राऊत (शिवसेना) - १०,६६० मते (सुमारे ३६.१४टक्के) - विजयी
तेजस्वी वसंतराव जाधव (भाजप) - ८,२९७ मते
स्वप्ना यशवंत देशपांडे (मनसे) - ८,२८७ मते
रोशना अश्विन शाह (काँग्रेस) - १,४६६ मते

राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे :
मुस्लिम-मराठी मतदारांचे समीकरण, शिवसेनेचा पारंपरिक प्रभाव आणि मजबूत बालेकिल्ला, जुन्या इमारतींचा रखडलेला पुनर्विकास आणि भोगवटा प्रमाणपत्रांचा प्रश्न

प्रमुख नागरी समस्या
- माहीम दर्गा परिसर व अंतर्गत भागांत वाहतूक कोंडी
- पावसाळ्यात पाणी भरणे
- जुन्या इमारती, चाळींचा रखडलेला पुनर्विकास
- अस्वच्छता व ढेपाळलेले कचरा व्यवस्थापन
- अपुरा पाणीपुरवठा व गटार व्यवस्था
- पार्किंगची कमतरता, पदपथावरील अतिक्रमण, उद्यानांची अपुरी देखभाल
- सार्वजनिक आरोग्य सुविधांवरील ताण

सतत सुरू असलेल्या कामामुळे माहिममध्ये राहणे अवघड झाले आहे. पावसाळ्यात पाणी साचते, रस्त्यांवर वाहतूक कोंडी असते, पण लोकप्रतिनिधींनी काही सुधारणा केल्या असल्या तरीही जलव्यवस्था आणि स्वच्छतेकडे लक्ष द्यायला हवे.
- सुमीत देशमुख, रहिवासी

जुन्या इमारतींचा पुनर्विकास खूप वेळ घेतोय. आमच्या प्रभागात लोकांची मोठी संख्या आहे. त्याचा नागरी सुविधांवर ताण आहे. निवडणुकीत उमेदवारांनी फक्त वचन न देता प्रत्यक्ष काम करावे, असे वाटते.
- रवी शिंदे, स्थानिक व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com