दत्तक वस्ती योजना पुन्हा सुरू करा!
दत्तक वस्ती योजना पुन्हा सुरू करा!
समन्वय समितीची मुख्यमंत्री, पालिका आयुक्तांकडे मागणी
मुंबई, ता. १८ ः सध्याच्या स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानामध्ये झोपडपट्ट्यांमधील नागरिक, कामगार, संस्था आणि मुंबई महापालिका यामध्ये कोणीही समाधानी नाही. त्यामुळे ही योजना बंद करून पूर्वीची जुनी दत्तक वस्ती योजना मुंबई महापालिकेने कामगारांना किमान वेतन देऊन पुन्हा सुरू करावी, अशी मागणी दत्तक वस्ती संस्था समन्वय समितीचे अध्यक्ष अरविंद वानखेडे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे त्यांनी योजना सुरू करण्यासाठी पत्राद्वारे मागणी केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतील झोपडपट्ट्यांमध्ये मुंबई महापालिकेद्वारे स्वच्छतेच्या सेवा पुरवल्या जात नव्हत्या, अशा झोपडपट्ट्यांमध्ये १९ मे २००१ पासून दत्तक वस्ती योजना मुंबई महापालिकेने सुरू केली. या योजनेमध्ये स्वच्छतेची कामे चांगली सुरू असताना मार्च २०१३ मध्ये ही योजना बंद करून स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान ही योजना सुरू केली.
स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान योजनेमध्ये काम करणाऱ्या संस्थांची काहीही चूक नाही, मात्र या योजनेत अनेक त्रुटी आहेत, त्या त्रुटींमुळे ही योजना पूर्णपणे फसली असून, विनाकारण स्वच्छतेची कामे करणाऱ्या संस्थांची आणि मुंबई महापालिका प्रशासनाची बदनामी होत आहे, असे समितीचे अध्यक्ष वानखेडे यांनी म्हटले आहे.
स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानातील कामगारांना २०१३ मध्ये ५,४०० रुपये मानधन स्वरूपात पगार दिला जातो. आता २०१३ च्या मानाने महागाई तीन पट वाढली असून, ५,४०० रुपयात संस्थांना कामगार मिळत नाहीत. मुंबई महापालिकेकडून मिळणाऱ्या या तुटपुंज्या अनुदानातून कामगारांचा पगार भागविणे कठीण जाते व कामगारांना १० ते १२ हजार रुपये द्यावे लागतात. त्याची तरतूद संस्थांना करावी लागते. म्हणून जास्त कामगारांचे अनुदान घेऊन कमी कामगार कामासाठी लावतात व संस्था अनुदान लाटतात, असे म्हणणे चुकीचे आहे. या योजनेची खरी माहिती न घेता ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवून या योजनेतील कामगारांबद्दलच्या वेतनाची चर्चा विधिमंडळात केली. अनेक सन्माननीय आमदार महोदयांनी या योजनेतील कामगारांना किमान वेतन लागू करावे, अशी मागणी केली ती स्वागतार्ह असल्याचे समितीचे अध्यक्ष वानखेडे यांनी म्हटले आहे.
चांगल्या योजनेचा राजकारणासाठी बळी
मुंबई महापालिकेची दत्तक वस्ती योजना लोकाभिमुख होती. या योजनेचा राजकारणासाठी बळी घेतला गेला आणि त्याऐवजी स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान ही योजना सुरू करण्यात आले त्याबद्दल मुंबईतील स्वच्छतेची कामे करणाऱ्या संस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे पूर्वीची दत्तक वस्ती योजना पुनरुज्जीवित करावी, अशी मागणी स्वच्छतेचे कामे करणाऱ्या संस्था करीत आहेत.

