अमली पदार्थ विक्रेत्यांच्या संघटित टोळ्या रडारवर

अमली पदार्थ विक्रेत्यांच्या संघटित टोळ्या रडारवर

Published on

अमली पदार्थ विक्रेत्यांच्या संघटित टोळ्या रडारवर
नववर्ष स्वागतासाठी पोलिस यंत्रणा सज्ज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ ः अमली पदार्थांच्या नशेत बेहोश होत, नववर्ष स्वागताचा पायंडा मुंबईसारख्या महानगरांमध्ये गेल्या काही वर्षांत रूढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर तमाम सुरक्षा यंत्रणांनी अमली पदार्थ उत्पादक, वितरक, वाहक, विक्रेत्यांच्या संघटित टोळ्या रडारवर घेतल्या आहेत. विशेष म्हणजे नाताळ ते ३१ डिसेंबरपर्यंत शहरात आयोजित सार्वजनिक, खासगी कार्यक्रमांवर या यंत्रणा लक्ष ठेवून असणार आहेत.

गेल्या आठवड्यात मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने वांद्रे आणि प्रभादेवी परिसरात केलेल्या कारवाया याच मोहिमेचा एक भाग होता. या कारवायांमध्ये सुमारे नऊ कोटी रुपयांचे कोकेन, एक्स्टॅसी (एमडीएमए) आणि परदेशी गांजा (हायड्रोपोनिक वीड) जप्त करण्यात आला. यातील एक्स्टॅसी गोळ्या आणि कोकेन पार्टी ड्रग्ज म्हणून ओळखले जातात.

नाताळ ते ३१ डिसेंबर हा अमली पदार्थ विक्रीचा मोठा हंगाम मानला जातो. या कालावधीत नियमित ग्राहकांसोबत नववर्ष स्वागताच्या निमित्ताने अमली पदार्थ पहिल्यांदाच चाखणाऱ्यांची मोठी भर पडते. यातील बहुतांश व्यक्ती विशेषतः तरुण पुढे या अमली पदार्थांचे नियमित सेवन करू लागतात. या हंगामासाठी शहरातील गल्लीबोळात अमली पदार्थ विकणारे दोन ते तीन आधीच पुरेसा साठा करून ठेवतात. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच सुरक्षा यंत्रणा सतर्क होतात. खबऱ्यांना कामाला लावून अमली पदार्थांची मोठी खेप पकडण्याचा, त्याद्वारे उत्पादक, विक्रेत्‍यांपासून किरकोळ विक्रेत्यांपर्यंतची संघटित टोळी उद्‌ध्‍वस्‍त करण्याचा प्रयत्न करतात.

मेक्सिको, लॅटिन अमेरिका येथे विशेष करून तयार केला जाणारा कोकेन या रासायनिक अमली पदार्थ भारतात आजही हवाई, जलमार्गाने चोरट्या मार्गाने दाखल होत आहे, मात्र गेल्या काही वर्षांत कोकेनला पर्याय ठरणारा एमडी (मेफेड्रॉन) या अमली पदार्थाची निर्मिती भारतात सुरू झाली. राज्य पोलिसांसह केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथक(एनसीबी), महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) या यंत्रणांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात सुरू असलेले एमडी उत्पादन घेणारे कारखाने उद्‌ध्‍वस्‍त केले आहेत. गेल्याच आठवड्यात मुंबई गुन्हे शाखेने सातारा येथे असाच एक कारखाना उद्‌ध्‍वस्‍त केला. कारखान्यांसह विक्रेत्यांवर होणाऱ्या कारवायांवरून एमडी या अमली पदार्थाचे उत्पादन इथल्या इथे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने तो सहजरीत्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे या अमली पदार्थाच्या साखळीवर यंत्रणांनी विशेष लक्ष केंद्रित केल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

एमडीसोबत परदेशी गांजाची विक्री रोखणे यंत्रणेसाठी आव्हान ठरले आहे. थायलंडमध्‍ये नैसर्गिक अर्थात गांजाच्या उत्पादन, वापरावर निर्बंध नव्हते. अलीकडेच त्या देशाने डॉक्टरांच्या सल्ल्याने पर्यटक गांजा सेवन करू शकतात, असा नियम केला. तेथे पाण्यावर तयार होणाऱ्या गांजाचे उत्पादन प्रचंड असून, भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ ठरते आहे. त्यामुळे दरदिवशी बँकॉकहून गांजा वाहून आणणारा किमान एक प्रवासी कस्टम विभागाच्या हाती लागतो. याशिवाय समुद्रीमार्गे आणि कुरिअर सेवेमार्फत होणारी तस्करी वेगळीच.

दुसरीकडे गांजा, चरसचे प्रमाणातील सेवन हानिकारक नाही. या पदार्थांना अमली पदार्थ म्हणू नये. त्यावरील निर्बंध शिथिल करावेत, ही तरुणवर्गाची जुनी मागणी आहे. तरुणवर्ग गांजाला अमली पदार्थ मानत नाही. त्यात परदेशी गांजात विविध फ्लेवर उपलब्ध असल्याने तो तरुणांसाठी आकर्षण ठरतो. त्यामुळे कधीकाळी श्रमिकांपुरते मर्यादित गांजा सेवनाचे वलय अनेकपटीने पसरले आहे. त्या पार्श्वभूमीवर एमडीप्रमाणे परदेशी गांजा विकणाऱ्यांनाही यंत्रणांनी रडारवर घेतले आहे.

...
अमली पदार्थविरोधी कारवाया सुरूच आहेत. ३१ डिसेंबरनिमित्त विक्रेते, वितरकांवर विशेष लक्ष ठेवून आहोत. नववर्ष स्वागतासाठी आयोजित कार्यक्रमांवरही अमली पदार्थविरोधी पथकाचे लक्ष असेल.
नवनाथ ढवळे, उपआयुक्त, अमली पदार्थविरोधी पथक

मुंबई पोलिसांची कारवाई- आकडेवारी
- नोव्हेंबर महिन्यापर्यंत मुंबईत १,६२७ किलो निरनिराळे अमली पदार्थ जप्त
-त्यात सर्वाधिक प्रमाण गांजा (१,३२२ किलो) व एमडीचे (२६७ किलो)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com