मुंबईत ‘आप’ स्वबळावर लढणार

मुंबईत ‘आप’ स्वबळावर लढणार

Published on

मुंबईत ‘आप’ स्वबळावर लढणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : आम आदमी पार्टीने (आप) मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा आज पत्रकार परिषदेत केली. कोणत्याही राजकीय पक्षाशी युती न करता मुंबईतील सर्व २२७ प्रभागांत आपचे उमेदवार उभे केले जाणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.

मुंबईची सध्याची अवस्था अत्यंत दयनीय असून, सर्व प्रस्थापित राजकीय पक्षांनी मिळून महापालिकेला लुटल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे. देशातील सर्वात मोठे आणि आशियातील सर्वाधिक बजेट असलेली मुंबई महापालिका असूनही मुंबईकरांना निकृष्ट दर्जाच्या सार्वजनिक सेवा मिळत असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. ‘पालिकेचे वार्षिक बजेट तब्बल ७४ हजार ४४७ कोटी रुपये आहे. देशात सर्वाधिक कर भरूनही मुंबईकरांना शिक्षण, आरोग्य, वाहतूक आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत सुविधा दर्जेदार मिळत नाहीत,’ असा आरोप ‘आप’ने केला.

पालिकेच्या शाळा बंद पडत असून, शिक्षणाचा दर्जा घसरत आहे, प्राथमिक आरोग्य केंद्रांची कमतरता आहे, रुग्णालयांवर प्रचंड ताण आहे आणि ‘बेस्ट’ उपक्रम पद्धतशीरपणे संपवला जात असल्याचा दावा पक्षाने केला.

कचरा व्यवस्थापन पूर्णपणे अपयशी ठरले असून, शहरभर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. झाडतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला असून, प्रदूषणाचा स्तर वाढला आहे. समुद्रकिनारी मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक दिल्लीप्रमाणे खराब झाल्याची टीका करण्यात आली. एकेकाळी ९० हजार कोटी रुपयांच्या असलेल्या महापालिकेच्या मुदत ठेवी मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचा आरोपही करण्यात आला.
...........
अकार्यक्षम लोकांना दूर करा
भ्रष्ट आणि अकार्यक्षम लोकांना दूर करण्यासाठी ‘झाडू’ची गरज आहे. केवळ सात नगरसेवक निवडून आले तरी आम्हाला सर्व वैधानिक समित्यांवर प्रतिनिधित्व मिळेल, असा दावा करण्यात आला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईत ५.१६ टक्के मते आणि दाेन लाख ७३ हजारांहून अधिक मते मिळाल्याची आठवण करून देत, या वेळी त्याहून चांगली कामगिरी करू, असा विश्वास ‘आप’ने व्यक्त केला आहे.
.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com