प्रभाग २०० मध्ये राजकीय धुसफूस!
प्रभाग २००मध्ये राजकीय धुसफूस!
भाजपमध्ये इच्छुकांचा महापूर, ठाकरेंपुढे गड राखण्याचे आव्हान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : मराठमोळ्या मतदारांचा परिसर अशी ओळख असणाऱ्या प्रभाग क्रमांक २००मध्ये अनेक दिग्गज इच्छुक उमेदवारांची उमेदवारीसाठी लॉबिंग सुरू आहे. सगळ्यांची समजूत घालता घालता, खासकरून स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांच्या नाकी नऊ आले आहेत. या प्रभागातून शिंदेेंच्या शिवसेनेनेदेखील दावा ठोकल्याने महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
प्रभाग क्रमांक २००मध्ये परळ, वडाळा आणि दादरचा काही भाग येतो. कोहिनूर मिल, बीडीडी चाळ, भोईवाडा, आदम मिस्त्री गल्ली, कोंडाजी चाळ, लेबर कॅम्प, मोराची चाळ, जेरबाई वाडिया रोड, टाटा रुग्णालयाचा मराठमोळा परिसर याच प्रभागात येतो. पोलिस वसाहतींमुळे पोलिसांच्या कुटुंबातील मतदारांची संख्यादेखील मोठी आहे. या प्रभागात गृहसंकुलांची संख्या अधिक असून गावठाण आणि काही प्रमाणात झोपड्यांचा समावेश आहे.
लोकसभेच्या दक्षिण मध्य मुंबई तर विधानसभेच्या वडाळा मतदारसंघात हा प्रभाग येत असून, येथून शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई खासदार तर भाजपचे कालिदास कोळंबकर आमदार आहेत. महत्त्वाचे म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या प्रभागातून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाले होते. या प्रभागातून ठाकरे गटाच्या उर्मिला पांचाळ या नगरसेविका होत्या. त्यामुळे हा परिसर ठाकरेंचा गड म्हणून ओळखला जातो.
एफ-दक्षिण वॉर्डअंतर्गत हा प्रभाग येत असून, या प्रभागातील लोकसंख्या सुमारे ५१,४०९ तर मतदारांची संख्या साधारणपणे ३८,००० ते ४०,००० च्या दरम्यान होती. गेल्या काही वर्षांत या भागात झालेल्या पुनर्विकासामुळे आणि नवीन टॉवर्समुळे मतदारांच्या संख्येत १० ते १५ टक्के वाढ झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०२५च्या निवडणुकीसाठी हा आकडा ४५,००० ते ४८,०००च्या आसपास असू शकतो.
महापालिकेच्या २०१७च्या निवडणुकीत हा प्रभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षित होता. या वेळी हा प्रभाग सर्वसाधारण खुला झाला आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार उर्मिला पांचाळ यांनी विजय मिळवला होता. त्या ९,०९८ मतांसह विजयी झाल्या होत्या. त्यांनी काँग्रेसच्या पल्लवी मुणगेकर (मते ६,९३७) पराभूत केले होते. यासह भाजपच्या ज्योत्स्ना धुमाळे पवार (मते ६,९२६) पराभूत झाल्या होत्या.
या वेळी हा प्रभाग सर्वसाधारण खुला झाल्याने इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढली आहे. भाजपमधूनच अजित वैगुडे, गजेंद्र धुमाळे, संदीप पानसांडे यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे भाजपमध्ये बंडखोरीची शक्यता बळावली आहे. याचबरोबर शिंदेंच्या शिवसेनेमधून सुनील मोरे यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. येथील दलित मतांचा प्रभाव पाहता रिपब्लिकन सेनादेखील या जागेवर दावा करीत आहे. आशीष बाफना यांनी येथून जोरदार तयारी सुरू केली आहे, तर काँग्रेसकडून सुरेश काळे हातपाय मारत आहेत.
प्रमुख समस्या
वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या, पुनर्विकास आणि पायाभूत सुविधांवरील ताण, पाण्याचा अपुरा पुरवठा आणि गळती, पावसाळ्यात पाणी साचणे, सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्य
राजकीय गणित
शिवसेनेतील उभी फूट, भाजपची वाढती ताकद, मनसेची भूमिका महत्त्वाची, पुनर्विकासाचा मुद्दा, मराठी मतांचे गणित
हक्काचे घर कधी मिळणार?
पुनर्विकासाची चर्चा वर्षानुवर्षे सुरू आहे, पण आमचे हक्काचे घर कधी मिळणार? जो पक्ष घरांचा प्रश्न निकाली काढेल आणि पाण्याचे प्रश्न सोडवेल त्यालाच आमचे मत असेल, अशी प्रतिक्रिया मतदार गजानन वळवी यांनी दिली.
पायाभूत सुविधा पुरवा
लाखोंचा कर भरूनही वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा त्रास कमी झालेला नाही. आम्हाला राजकीय भांडणे नकोत, फक्त राहण्यायोग्य पायाभूत सुविधा देणारा नगरसेवक हवाय, अशी प्रतिक्रिया मतदार रश्मी जामखेडे यांनी दिली.

