​१५१ वर्षांचा वारसा आणि २२७ जागांचा रणसंग्राम

​१५१ वर्षांचा वारसा आणि २२७ जागांचा रणसंग्राम

Published on

​१५१ वर्षांचा वारसा आणि २२७ जागांचा रणसंग्राम
इतिहासात पहिल्यांदाच इतक्या उशिराने निवडणुका; शिवसेनेसमोर सत्ता टिकवण्याचे आव्हान
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २० : ​पेटिट स्ट्रीटवर ४ सप्टेंबर १८७३ रोजी मुंबई महापालिकेची पहिली बैठक पार पडली, तेव्हा कोणालाही कल्पना नव्हती की ही संस्था आशियातील सर्वात मोठी महापालिका बनेल. ब्रिटीश राजवटीत ६४ सदस्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आता २२७ जागांच्या रणधुमाळीपर्यंत येऊन पोहोचला आहे. १८९३ पासून पालिकेची भव्य इमारत या लोकशाहीच्या संघर्षाची साक्षीदार राहिली आहे. राज्‍यातील बदलेली राजकीय समीकरणे आणि मुंबई जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी बळ लावल्‍याने यंदाची निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे.

​बदललेली राजकीय समीकरणे
मुंबई पालिकेची ​या वेळची निवडणूक ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची ठरण्याचे कारण म्हणजे ​जागांचा पेच. महाविकास आघाडीच्या काळात वाढवलेली २३६ ही सदस्य संख्या विद्यमान सरकारने रद्द करून पुन्हा २२७ वर आणली आहे. त्यामुळे या वेळची लढत जुन्याच प्रभाग रचनेनुसार; पण नव्या राजकीय समीकरणांनुसार होईल.

१९७१ मध्ये फडकला भगवा
​महापौरपदाचा इतिहास पहिला तर १९३१ मध्ये जे. बी. बोमन बेहराम यांनी पहिले महापौर म्हणून सूत्रे हाती घेतली होती. तर १९७१ मध्ये शिवसेनेने हेमचंद्र गुप्ते यांच्या माध्यमातून मुंबईवर भगवा फडकला होता. यंदा भाजप आपला पहिला महापौर बसवण्यासाठी तर शिवसेना आपला गड राखण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार आहे.

​लोकशाहीचा उत्क्रांतीचा प्रवास :
​स्वातंत्र्यापूर्वी केवळ करदात्यांना मतदानाचा अधिकार असण्यापासून ते १९४८ मध्ये मिळालेल्या सार्वत्रिक प्रौढ मताधिकारापर्यंतचा महापालिकेचा प्रवास थक्क करणारा आहे. एकेकाळी पोलिस आयुक्त आणि पीडब्ल्यूडी प्रतिनिधी पालिकेचे कामकाज पाहत असत; मात्र आता पूर्णपणे जनतेच्या प्रतिनिधींच्या हाती सत्ता आली आहे.

​प्रशासक राजवटीचा अंत
​गेल्या काही काळापासून मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे. मार्च २०२२ मध्ये महापालिकेची मुदत संपल्यानंतर कोविड महामारीमुळे निवडणुका लांबल्या. त्या आता थेट साडेतीन वर्षांनी होऊ घातल्या आहेत. महापालिकेच्या इतिहासात अशी परिस्थिती कधीही ओढवली नव्हती. कोविड महामारीचा जोर ओसरल्यानंतरही निवडणुका होत नव्हत्या. निवडणूक आयोगाच्या घोषणेमुळे आता मुंबईला पुन्हा एकदा लोकनियुक्त प्रतिनिधी आणि हक्काचा महापौर मिळणार आहे. त्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत.

कमळ फुलवण्याचे स्‍वप्न
​मुंबई महापालिकेवर गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता होती; मात्र गेल्या पाच वर्षांत राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. शिवसेनेने भाजपची साथ सोडली असून, पक्षात पडलेल्या फुटीमुळे आता सत्ता टिकवणे शिवसेनेसाठी मोठे आव्हान ठरत आहे. यंदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना अशा दोन्ही आघाड्यांवर लढावे लागणार आहे. त्यांच्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे असले तरी ठाकरे आपली सत्ता राखणार की भाजप महापालिकेवर कमळ फुलवण्याचे आपले स्वप्न पूर्ण करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com