पवई तलावाची होणार डिजिटल मोजणी

पवई तलावाची होणार डिजिटल मोजणी

Published on

पवई तलावाची होणार डिजिटल मोजणी
तलावाचे अस्तित्व टिकवण्यासाठी महापालिकेचे मोठे पाऊल
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २३ : मुंबईच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या आणि जैवविविधतेने नटलेल्या पवई तलावाच्या सीमा निश्चित करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. तलावाच्या जमिनीवर होत असलेली अतिक्रमणे रोखण्यासाठी आणि तलावाची नेमकी सीमा निश्चित करण्यासाठी पालिकेने एका विशेष सल्लागाराची नियुक्ती केली असून, लवकरच तलावाचे नवीन सर्वेक्षण सुरू होणार आहे.
​पवई तलावाला लागूनच असलेल्या आयआयटी बॉम्बे प्रशासनाने केलेल्या विनंतीनंतर महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. या सर्वेक्षणादरम्यान केवळ कागदावरच नव्हे, तर जमिनीवर प्रत्यक्ष खुणा करून तलावाची सीमा निश्चित केली जाईल. यासाठी आयआयटी बॉम्बे, लार्सन अँड टुब्रो , हिरानंदानी येथील रहिवासी आणि परिसरातील हॉटेल व्यावसायिकांशी पालिका सातत्याने चर्चा करत आहे.
​पर्यावरणवादी कार्यकर्ते झोरू भाथेना यांनी २०२२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्‍या याचिकेत त्यांनी तलावाच्या १०० मीटरच्या बांधकाम बंदीच्या संरक्षक क्षेत्राचे संरक्षण करण्याची मागणी केली होती. अनेक मोठ्या संस्था, हॉटेल्स आणि भाडेपट्ट्याने घेतलेल्या मालमत्तांनी तलावाच्या काठावर ताबा मिळवल्याचा आरोप आहे. अनेकदा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही या भागात प्रवेश नाकारला जातो, असे याचिकेत नमूद करण्यात आले होते.
​२०२१ मध्ये पालिकेने तलावाच्या कडेला सायकल ट्रॅक आणि वॉक-वे बनवण्याची योजना आखली होती. मात्र, पर्यावरणाचे नुकसान होईल या कारणास्तव पर्यावरणवाद्यांनी तीव्र विरोध केला, ज्यामुळे पालिकेला तो प्रकल्प मागे घ्यावा लागला होता. आता केवळ तलावाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने हे सीमांकन केले जात आहे. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर तलावाच्या परिसरात कोणत्या प्रकल्पांना परवानगी द्यायची आणि अतिक्रमणे कशी हटवायची, याचा निर्णय पालिका प्रशासन घेणार आहे.

कसे होणार सर्वेक्षण?
​महापालिकेने यासाठी टोटल स्टेशन सर्व्हे तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरवले आहे. त्‍यामुळे तलावाचे अचूक अक्षांश-रेखांश मिळतील.​ तलावाच्या अधिकृत नकाशावर सीमा निश्चित केल्या जातील. ​नेमकी किती अतिक्रमणे झाली आहेत, हे स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com