ठाकरे बंधूंच्या युतीचा मास्टरप्लॅन

ठाकरे बंधूंच्या युतीचा मास्टरप्लॅन

Published on

ठाकरे बंधूंच्या युतीचा मास्टरप्लॅन
राज्यातील १० महापालिकांसाठीही मनसे-ठाकरे गट एकत्र

मिलिंद तांबे : सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २३ : आगामी पालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून, सर्वांचे लक्ष मुंबई महापालिकेवर लागले आहे. त्यातच आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती केवळ मुंबईपुरती मर्यादित नसून, महाराष्ट्रातील ९ ते १० प्रमुख महापालिका निवडणुका दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.
नुकत्याच झालेल्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत ठाकरे गट आणि मनसेची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाने ही निवडणूक गांभीर्याने घेतली नव्हती, असे चित्र होते. महायुतीच्या नेत्यांप्रमाणे राज आणि उद्धव ठाकरे प्रचाराच्या मैदानात उतरले नाहीत, ज्याचा फटका निकालात बसल्याचे दिसते. मात्र, आता महापालिका निवडणुकीत ही चूक टाळण्यासाठी दोन्ही बंधूंनी कंबर कसली आहे. मुंबई महापालिकेसाठी मंगळवारी (ता. २३) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे; मात्र अद्याप जागावाटप झाले नसून काही जागांवर वाद असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये दादर, शिवडी, माहीम, भांडुप, मुलुंड आणि विक्रोळी या मराठीबहुल भागांत दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. ‘जागावाटपाची चर्चा फार लांबवू नका, जिथे घोडे अडले आहे, तिथे जास्त रस्सीखेच करू नका,’ असा स्पष्ट निरोप राज ठाकरे यांनी संजय राऊत आणि अनिल परब यांच्यामार्फत ठाकरे गटाला दिल्याचे समजते आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरेंच्या सूचनेनंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये ‘सामना’ कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेचा अहवाल राज आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष ठाकरे बंधूच या जागावाटपाचा अंतिम तिढा सोडवतील, अशी शक्यता आहे.
...
नवी दिशा
विश्वसनीय सूत्रांच्या मते, मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण-डोंबिवली यांसारख्या ९ ते १० मोठ्या शहरांमध्ये दोन्ही ठाकरे एकत्र लढण्याची शक्यता आहे. ही युती केवळ निवडणुकीपुरती नसून, आगामी राजकारणाची नवी दिशा ठरवणारी ठरू शकते, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
...
​भाजपची रणनीती
​भाजपने या युतीला उत्तर देण्यासाठी आक्रमक पाऊल उचलले आहे. ‘तिकिटाची वाट पाहू नका, भाजपचा प्रचार घरोघरी पोहोचवा,’ अशा सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. भाजपने यासाठी २७ वेगवेगळ्या समित्यांची स्थापना केली असून, निवडणूक संचलन समितीने प्रचाराचे सूक्ष्म नियोजन पूर्ण करण्यात आले आहे.
...
आज युतीवर शिक्कामोर्तब
महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना (ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यात युती निश्चित झाली असून, उद्या (ता. २४) दुपारी १२ वाजता याची अधिकृत घोषणा होणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘एक्स’द्वारे पोस्ट टाकत याचे संकेत देणारी माहिती दिली आहे. ​वरळी येथील हॉटेल ब्लू सी येथे या संयुक्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येऊन युतीची अधिकृत घोषणा करतील. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सुरू असलेल्या मॅरेथॉन बैठकांनंतर हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
...
संभाव्य फॉर्म्युला
​सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील २२७ जागांसाठी जागावाटपाचे गणित जवळपास निश्चित झाले आहे.​ शिवसेना ठाकरे गट १४५ ते १५० जागा आणि ​मनसे ६५ ते ७० जागा लढवील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट १० ते १२ जागा लढवेल. ​विशेष म्हणजे, २०१७ मध्ये ठाकरे गटाने जिंकलेल्या ज्या जागांचे नगरसेवक आता शिंदे गटात गेले आहेत, त्यातील १२ ते १५ जागा मनसेला सोडण्यात आल्या आहेत. तिथे मनसेकडे ताकदवान उमेदवार असल्याने हा निर्णय घेतल्याचे समजते.
...
​रणनीती आणि तिढा
​मुंबईतील अमराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही पक्षांनी विशेष रणनीती आखली आहे. भांडुप, कांदिवली, बोरिवली आणि मुलुंड येथील काही जागांवरून अद्यापही किरकोळ चर्चा सुरू आहे. मात्र, राज ठाकरे यांनी सर्व जागांचा तिढा सुटल्याशिवाय घोषणा न करण्याचा पवित्रा घेतल्याने मंगळवारी रात्रीपर्यंत यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्याचे ठरले. ३१ डिसेंबरला अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने, उमेदवारांना प्रचार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा या उद्देशाने उद्याच ही घोषणा केली जाणार आहे.
...
चर्चा करूनच  निर्णय : सुप्रिया सुळे
आघाडीबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. आघाडीबाबत जो काही निर्णय घेतला जाईल, तो सर्वांशी चर्चा करून घेतला जाईल. नेत्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही,’ असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी (ता. २३) झालेल्या बैठकीनंतर स्पष्ट केले.
खासदार सुळे म्हणाल्या, की आमचा पक्ष हा लोकशाही पद्धतीने चालतो. त्यामुळे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ता यांना विश्वासात घेतल्याशिवाय पक्ष कोणताही निर्णय घेणार नाही.  पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याशी दोन तास चर्चा झाली. कोणताही अधिकृत प्रस्ताव कोणत्याही पक्षाचा माझ्याकडे आलेला नाही.  मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी चर्चा सुरू आहे. पुण्यामधूनही अनेक चर्चा सुरू आहेत. महाविकास आघाडीचे जागावाटप हे अंतिम टप्प्यात आहे. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या हिताचे जे असेल तसा निर्णय घेतला जाईल. ही निवडणूक कार्यकर्ता हा केंद्रबिंदू ठेवून, पुणेकर हा केंद्रबिंदू ठेवून, पुण्याचा विकास हा केंद्रबिंदू ठेवूनच पक्ष निर्णय घेईल, असे  सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
...
महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढणार!
राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष आणि कोअर कमिटी, शिवसेना शिंदे गटाव्यतिरिक्त सगळ्या पक्षांसोबत चर्चा करीत आहे. शिवसेना ठाकरे गटासोबतदेखील चर्चा सुरू आहे. त्या सर्व चर्चा करीत असताना नुकतीच एक बैठक झाली आहे. काही जागांबद्दल थोडेसे मतभेद आहेत आणि मागणी आहे.  बैठकीत साधारणत: महाविकास आघाडी म्हणून मुंबईत एकत्र निवडणूक लढवण्याचा निश्चितपणे निर्णय घेतला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com