

विरार-अलिबाग मल्टीकॉरिडॉरमधून म्हाडाला हवेत ५० कोटी
प्रकल्पाला जाणाऱ्या जागेच्या बदल्यात म्हाडाचा दावा; एमएसआरडीसीला दिले पत्र
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : म्हाडाच्या कल्याण तालुक्यातील शिरढोण येथे तब्बल १६ हजार घरांचा प्रकल्प असून, त्याच्या मध्य भागातून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) उभारला जात असलेला विरार-अलिबाग मल्टीकाॅरिडाॅर जाणार आहे. त्यासाठीची भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पासाठी म्हाडाची सुमारे पाच हेक्टर जमीन जाणार असून, त्याबदल्यात तब्बल ५० कोटी रुपये देण्याबाबत म्हाडाने एमएसआरडीसीला पत्र दिले आहे.
म्हाडाकडून सर्वसामान्यांना जास्तीत जास्त घरे उपलब्ध व्हावीत, यासाठी शिरढोण येथे अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील १६ हजार घरे उभारली जात आहेत. त्यापैकी सुमारे १० हजार घरे तयार झालेली आहे. दरम्यान, या प्रकल्पाच्या मध्य भागातून विरार-अलिबाग मल्टीकाॅरिडाॅर जाणार असून, नजीकच इंटरचेंज होणार असल्याने या प्रकल्पात घरे घेणाऱ्यांना भविष्यात मोठा फायदा होणार आहे. दरम्यान, एमएसआरडीसीच्या मल्टीकाॅरिडाॅरसाठी ५०० मीटर लांबीचा आणि १०० मीटर रुंदीचा भूखंड जाणार आहे. त्यामुळे प्रकल्पाची विभागणी होणार आहे. त्याबाबतचे एमएसआरडीसीने संरेखन पूर्ण केलेले असल्याने आता म्हाडानेही पैसे मिळवण्यासाठी हलचाली सुरू केल्या असून, त्याबातचे पत्र एमएसआरडीसीला दिले असल्याचे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
शिरढोण गृह प्रकल्पाला फायदा होणार
विरार-अलिबाग मल्टीकाॅरिडाॅरच्या नियोजित आराखड्यानुसार शिरढोण येथील म्हाडाच्या गृहप्रकल्पानजीकच इंटरचेंज होणार आहे. त्यामुळे येथील नागरिकांना सदर काॅरिडाॅरचा वापर करता येणार आहे. परिणामी म्हाडाच्या या गृह प्रकल्पाला फायदा होऊ शकणार आहे.